पान:साथ (Sath).pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " उदाहरणार्थ ?"
 " की तुझं दुसऱ्याच कुणावर प्रेम होतं पण तुझ्या बाबांना ती पसंत नव्हती म्हणन तू माझ्याशी लग्न केलंस."
 " बिनडोक आहेस. माझ्या मनात कुणाशी तरी लग्न करायचं असतं तर बाबांनी आकाशपाताळ एक केलं असतं तरी ते मला थांबवू शकले नसते एवढं तुला अजून कळलं नाही ? माझं तुला भेटण्याआधी कुणावरही प्रेम नव्हतं. तुझं होतं ?"
 “ नाही." एका लांबलांबच्या भावावर ती काही काळ मरत असे पण त्याचा आत्ता उल्लेख करायचं कारणच नव्हतं.
 " झालं तर. म्हणजे आपलं फक्त एकमेकांवरच प्रेम आहे. हो ना?"
 ती हसत हसत म्हणाली, " हे सगळं तू किती कोरडेपणानं एखादं भूमितीचं प्रमेय सिद्ध केल्यासारखं म्हणतोयस रे.”
 ह्या सगळ्यात तिला जे सांगायचं होतं ते राहूनच गेलं, की त्याच्या बुद्धीचा डिग्रीशी अर्थाअर्थी काही संबंध नाही म्हणून. बऱ्याच दिवसांनी अवचित तिला कळून आलं की त्याचा कबुलीजबाब खरा नव्हताच. एक तर घटनांचा क्रम त्याने दिल्याप्रमाणे नव्हता. फायनलला न बसण्याचा निर्णय घेऊन तो घरी आला त्याच्यानंतर किती तरी दिवसांनी त्याच्या आईचा शेवटचा आजार उद्भवला. आणि परीक्षेला बसलो असतो तर नक्की पास झालो असतो असं जे त्यानं सूचित केलं तेही बरोबर नव्हतं. खरं म्हणजे अभ्यासात त्याची म्हणावी तशी प्रगती नव्हतीच. आधीच्या एका वर्षी तो एकदा नापास झालेला होता. शेवटच्या परीक्षेची त्याची काही तयारी झालेली नव्हती. तो नापास होणार हे जवळजवळ ठरल्यातच जमा होतं. तेव्हा हात दाखवून अवलक्षण करून घेण्यापेक्षा परीक्षेला बसूच नये असं त्यानं ठरवलं.
 ज्योतीला दुःख झाल ते त्याने केलेल्या प्रतारणेचं. त्यानं कॉलेजची डिग्री मिळवली नव्हती ह्याचं तिला काही विशेष वाटल नाही. तिला नेहमीच वाटत राहिलं की अभ्यासात त्याची गती नसण्याचं कारण बुद्धीचा अभाव नसून इच्छाशक्तीचा अभाव हे

६०:साथ