" काय केलं नाहीस? मी बोललो ते अगदी खरं आहे. तुझ्याशिवाय हे काहीच माझ्या हातनं झालं नसतं."
" तू जर करायचं ठरवलं असतंस तर नक्की झालं असतं."
" मग इतक्या वर्षांत का नाही झालं?"
"तू अगदी मनापासून प्रयत्नच केला नसशील."
" तसं काही नाही. त्यातली मेख अशी आहे की तुला माझ्यापेक्षा जास्त बुद्धी आहे."
"हा निष्कर्ष तू कशावरून काढलास ? "
" तुझं शिक्षण माझ्यापेक्षा जास्त झालेलं आहे."
"तुला नक्की काय सिद्ध करायचंय मला कळत नाहीये, तेव्हा हा वाद आपण आता इथेच थांबवूया."
काही वेळानं तो म्हणाला, “ झोपलीस, ज्योती ?"
" अंहं."
" मला एक कबुली द्यायचीय."
" काय ? " तिने भीतभीतच विचारलं. पूर्वायुष्यात घडलेली काहीतरी गोष्ट त्याने सांगू नये अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ज्या गोष्टीशी तिला काही देणंघेणं नव्हतं ती ऐकायची तिला काही इच्छा नव्हती.
तो म्हणाला, "मी तुझा असा समज करून दिला की मी ग्रॅज्युएट आहे. पण मी फायनलला बसलोच नव्हतो. आईची तब्बेत एकदम बिघडली म्हणून मी घरी आलो. मग ती वारली नि मी परत कॉलेजला गेलोच नाही. शेतीचं काम बघायला सुरुवात केली, मग परत जाऊन परीक्षेला बसायचं काही महत्त्व वाटेनासं झालं."
ज्योतीला जीव भांड्यात पडल्यासारखं झालं ती म्हणाली, " एवढंच ना ? "
" एवढंच ना म्हणजे काय ? " आपल्या कबुलीजबाबाला तिनं इतकं क्षुल्लक ठरवावं याचा त्याला राग आला. " तुला काय वाटलं मी कशाची कबुली देणाराय म्हणून ?"
" काहीतरी भयानक."
साथ : ५९