द्यायला एवढंच नव्हे तर एखादा ग्लास प्यायलासुद्धा ज्योती सरावली तरीसुद्धा वार्ताहरांना ओली पार्टी देणं हा प्रकार तिला, खटकतच राहिला.
रामने समारंभाच्या सबंध दिवसाची योजना इतकी चोख बनवली होती की सगळं एखाद्या वंगण केलेल्या यंत्राप्रमाणे सुरळीत पार पडलं. वीज बोर्डानेसुद्धा सहकार्य दिलं आणि मंत्र्यांनी बटन दाबल्याबरोबर वीज बंद न पडता सगळी यंत्रं व्यवस्थित चालू झाली.
मंत्र्यांनी अर्थातच अपेक्षेप्रमाणे आपल्या देशात शेतीचं किती महत्त्व आहे, उत्तम शेतीचा पाया खात्रीचे बियाणे कसा आहे, आणि रामसारख्या उद्योजकांची देशाला कशी गरज आहे हे आपल्या भाषणात सांगितलं. आपल्या आभारप्रदर्शनाच्या भाषणात राम म्हणाला की बियाणावर मोठ्या प्रमाणात प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यामुळे शेतकऱ्यांना जास्त चांगली सेवा देता येईल ह्याचाच त्याला मुख्यत्वाने आनंद झाला होता. रामला तिने कधी 'जगाच्या कल्याणा' वगैरे मुखवटे घालताना पाहिलं नव्हतं. तिनं जरा आश्चर्यानेच त्याच्याकडे बघितलं पण त्याच्या चेहऱ्यावर तिला संपूर्ण गंभीरतेखेरीज दुसरा कुठलाच भाव दिसला नाही. आणखी त्याने तिचे पण आभार मानून तिच्या मदतीशिवाय हे काहीच शक्य झालं नसतं असं सांगितलं.
त्या रात्री तिला मिठीत घेऊन तो म्हणाला, " चला, आपली वाटचाल तर सुरू झाली."
" वाटचाल ? "
"हं. राज्यातली सगळ्यात मोठी बियाणांची कंपनी होण्याच्या दिशेनं."
"श् अशी प्रौढी मिरवणं अशुभ असतं."
" तुझा असल्या मूर्ख समजुतींवर विश्वास आहे ?"
" नाही खरं म्हणजे, नाही, तरी पण-"
" तरी पण बिरी पण काही नाही. बरं, ते जाऊ दे. आता हा मुहूर्त साधून आपल्या मुलाच्या जन्माची तयारी करायला हरकत
साथ : ५७