पान:साथ (Sath).pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाजवायची हा प्रकार तिला पसंत नव्हता. पाहुण्यांना चहाफराळाचं द्यायला पुण्याहून खास केटरर्स बोलवायचे म्हणजे तिच्या मते उधळपट्टीची परिसीमाच होती. पण तिला सगळ्यात धक्का बसला म्हणजे वार्ताहरांना ओली पार्टी देण्याच्या बेताने. आधी ती ज्या वातावरणात वाढली होती त्यात पिणंबिणं तर लांबच राहिलं, पण दारू ह्या विषयावर बोललंही जात नसे. दारू हा सभ्य लोकांचा प्रांत नाही अशी ठाम कल्पना.
 राम म्हणाला, " मलाही ते विशेष पसंत आहे असं नाही, पण बातमी छापून यायला हवी असली तर करावं लागतं."
 " त्यांनी तुला असं स्पष्ट सांगितलं?"
 " ज्याला मी वार्ताहरांशी संपर्क साधायला सांगितलं होतं तो तसं म्हणाला. तो म्हणाला त्यांची तशी अपेक्षा असते. आणि ती पुरी झाली नाही तर ते बातमी दडपून तरी टाकतात नाही तर दडपून टाकण्याएवढी क्षुल्लक वाटली नाही तर कुठल्या तरी मागल्या पानावर लक्षातसुद्धा येणार नाही अशा बेतानं दोन ओळींत छापतात."
 " माझा नाही विश्वास बसत."
  " विश्वास ठेवावाच लागेल तुला. तू असं बघ, पेपरमधे ठराविकच जागा असते, आणि तिथे छापण्यासाठी हजारो बातम्यांची अहमहमिका असली पाहिजे. तेव्हा एक विशिष्ट बातमी देण्यात बातमीदाराला काहीतरी स्वारस्य वाटलं पाहिजे.”
  " म्हणजे आपण पेपरमधे जी बातमी वाचतो त्या प्रत्येकीसाठी कुणातरी बातमीदाराला कुणीतरी दारू पाजलेली असते ? "
 " अगदी असंच नाही. काही बातम्या इतक्या महत्त्वाच्या असतात की त्या विनासायास छापल्या जातात."
 " मग ही त्यातलीच नाही का ? "
  " असं तुला वाटतं. सगळ्यांनाच वाटेल असं नाही."
  शेवटी प्रत्येक बाबतीत तिचे आक्षेप खोडून काढून रामन आपल्या मनासारखंच केलं. पुढे पुढे दारू पिण्यात नैतिक अधःपतन आहे ही कल्पना सोडून देऊन मेजवानीच्या वेळी पाहुण्यांना दारू

५६ : साथ