पान:साथ (Sath).pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आहे, ज्योती. ते खर्चाचा थोडा वाटाही उचलणार आहेत. आम्ही हे कर्ज देऊन समाजाचं केवढं भलं करतो आहोत असा डांगोरा पिटायचाय ना त्यांना. आणि अर्थात जेवढी जमेल तेवढी प्रसिद्धी आपल्यालाही हवीच आहे, पुढच्या विक्रीच्या दृष्टीनं."
 राज्याच्या कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं हे ऐकून तिचे डोळे विस्फारले.
 " ते आमंत्रण स्वीकारतील का पण ?"
 " अर्थात स्वीकारतील. राजकारण्यांना तरी काय हवं असतं? पेपरात नाव आलं म्हणजे झालं."
 त्यानं मंत्र्यांबद्दल इतकं तुच्छतेनं बोलावं नि तरीसुद्धा त्यांना कारखान्याचं उद्घाटन करायला बोलवावं हे ज्योतीला खटकलं. मंत्र्यांचा पुतण्या म्हणे त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होता. तसा तो खास मित्र वगैरे नव्हता, पण चुलत्याकडे वशिला लावण्यासाठी त्याचा पत्ता काढून रामने मुद्दाम ओळख उकरून काढली होती हेही तिला फारसं आवडलं नव्हतं. पुढे रामला असं करताना तिनं पुष्कळ वेळा पाहिलं होतं. त्याच्या मनात छोटया छोटया कप्प्यांचं एक मोठं थोरलं कपाट होतं. त्या कप्प्यांतून तो निरनिराळया तऱ्हेची माहिती व्यवस्थित ठेवून देत असे. मग कधी कशाचा किंवा कुणाचा नेमका उपयोग होईल, ते हेरून ती माहिती तो वापरायचा. यासाठी अतिशय तल्लख बुद्धीची गरज असते आणि ती रामकडे निर्विवादपणे होती. तिचा उपयोग करून त्याने वेळोवेळी काहीतरी घबाड पदरात पाडून घेतलं होतं किंवा प्रतिस्पर्ध्यावर मात केली होती. असं करण्यात गैर काही नाही, किंबहुना व्यवसायात यश मिळवायचं म्हणजे सामान्य नीतिमत्तेच्या कल्पना धरून बसण्यात हशील नसतं हे ज्योतीला तात्त्विक पातळीवर पटत होतं. तरी पण आपल्या गरजेप्रमाणे माणसांचा उपयोग करून घेणं हे ती व्यवहारात कधीही स्वीकारू शकली नाही.
 उद्घाटन समारंभाच्या बाबतीत रामशी तिचे आणखीही मतभेद होते. एक म्हणजे लाउडस्पीकर लावून दिवसभर गाणी

साथ: ५५