पान:साथ (Sath).pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यंत्रं नीटपणे चालणार नाहीत, वरच्यावर बिघडतील. मग त्यांची दुरुस्ती म्हणजे पुन्हा खर्च आला. शिवाय ती दुरुस्तीसाठी बंद राहिली म्हणजे काम ठप्प. म्हणजे प्रॉसेसिंगचा खर्च वाढत जाणार. मग पुन्हा विक्रीचा प्रश्न आहे. आपण तयार केलेलं जवळजवळ सगळं बियाणं जर विकलं नाही तर बँकेचे हप्ते भरणं जड जाईल."
 राम हसत सुटला. "बास, बास. तू हे असं आणखी थोडा वेळ चालू ठेवलंस तर आपल्यावर भयंकर संकट कोसळणार आहे अशी माझीसुद्धा खात्री पटेल. तू त्या विहिरीत डोकावून ओक्साबोक्शी रडणाऱ्या बाईसारखी आहेस. तिला विचारलं, बाई, काय झालं तुला ? का रडतेस ? तर ही म्हणाली, उद्या माझं लग्न होईल, मग मला मूल होईल, नि ते मूल रांगत रांगत इथपर्यंत आलं तर ह्या विहिरीत पडेल. म्हणून मी रडत्येय. ज्योती, तू पैशाच्या बाबतीत तुझी मध्यमवर्गीय मनोवृत्ती सोडून दे. धंदा करायचा म्हणजे प्रथम आत्मविश्वास पाहिजे. धोका पत्करायची धमक पाहिजे. धोके पत्करल्याशिवाय मोठं होता येत नाही. आहे तेवढा धंदा रुटुखुटु चालवत बसण्यासाठी मी ह्यात पडलो नाही. मला खूप मोठं व्हायचंय. सगळ्यांना मागे टाकायचंय."
  तो असं बोलायला लागला की आपल्या भेदरटपणाची तिला लाज वाटायची. आपण त्याच्या बरोबरीने वाटचाल करू शकत नाही, मागे पडतोय असं वाटायचं.
  त्यांचं हे बोलणं झाल्यावरही तिच्या मनावरचं दडपण कायमच राहिलं, पण ठीक आहे, इतक्यात काही होत नाही, अजून वेळ आहे असं म्हणून तिनं ते झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात इमारत उभी राहून त्यात यंत्रं बसवण्याचं वगैरे काम वर्षाच्या आत पुरं झालं. आणि मग रामने त्याचे उद्घाटन समारंभाचे बेत आणि त्यावर करायच्या खर्चाचा आकडा सांगितला तेव्हा तिला आणखी एक धक्का बसला.
 ती म्हणाली, " एवढा थोरला खर्च उद्घाटनावर करायच्या पेक्षा त्याच पैशांनी कर्जफेड करायला सुरुवात करता येईल की ."
 " बँकेला हप्ता लगेच मिळण्यापेक्षा प्रसिद्धीची जास्त हाव

५४ : साथ