पान:साथ (Sath).pdf/57

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पण तो जी स्वप्नं पहात होता ती अगदी उद्याच प्रत्यक्षात उतरतील अशी तिची कल्पना नव्हती. त्यांची कंपनी वाढत होती, नवी क्षितिजं काबीज करीत होती, तेव्हासुद्धा या प्रवासाचा शेवटचा टप्पा कुठला आणि तिथे पोचण्याचा नेमका अर्थ काय याची तिला जाणीव नव्हती.
 त्यांच्या कंपनीची उलाढाल वेगाने वाढत होती, त्यांच्या नोकरवर्गात सारखी भर पडत होती, ते नवनव्या जातींच्या बियाणांचं उत्पादन आणि विक्री करीत होते, कंपनीत संशोधन विभाग सुरू झाला होता. सगळं क्रमाक्रमानं चाललं होतं, आणि ते घडत असताना त्याला हातभार लावायला ज्योतीला हुरूप वाटत होता. रामइतक्याच हिरिरीने ती स्वतःला त्यात झोकून देत होती. तरीसुद्धा आज तिला वाटत होतं की नेमकं कुठं जातोयत ह्याचं आकलन होण्यापूर्वीच आपण इथपर्यंत येऊन ठेपलोत.
 आणि आता इथून पुढचा मार्ग कोणता ? कुठे जाणार होती ती ? काहीतरी नोकरी करायची हे ती गृहीत धरूनच चालली होती. तशी पोटासाठी मिळविण्याची तिला गरज नव्हती, पण शरीराला आणि बुद्धीला काहीतरी खाद्य हवंच. घरी बसायचं आणि मग केवळ वेळ काढण्यासाठी करायला काहीबाही शोधायचं हे तिला करायचं नव्हतं. पण नोकरी मिळवायची कुठून ? तशा पुण्यात आता तिच्या पुष्कळ ओळखी होत्या. पण मित्रमंडळींकडे नोकरीची भीक मागण्याची कल्पना तिला कशीशीच वाटली. नोकरी मागायला गेल्यावर ती रामपासून वेगळी झाल्याचं त्यांना कळणारच. मग त्यांना बसलेला धक्का, तिच्यावर अटळपणे होणारा प्रश्नांचा भडिमार, राम आणि ती ह्यांच्यात समेट घडवून आणण्याचे प्रयत्न हया सगळ्याला तोंड देणं अशक्यच होतं.
 तिला मंगलची आठवण झाली. मंगलच्या नवऱ्यानं तिला टाकलं तेव्हा ज्योती म्हणाली होती, " बिच्चारी! " राम म्हणाला होता, " तुला वाटतं एवढं काही मोठं संकट नाही ते. इतक्या बायकांवर असा प्रसंग येतो की त्याचा फारसा बाऊ न करता त्या तो स्वीकारतात."

[४]

साथ:४९