पान:साथ (Sath).pdf/56

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अर्थात हया सगळ्या सूत्रांच्या केंद्रस्थानी राम होता. त्याला स्वतःला कामाचा प्रचंड उत्साह आणि उरक होताच, पण इतरांनाही त्याच्याकडून अथक परिश्रमाची प्रेरणा मिळत असे. त्याच्याबरोबर काम करताना ज्योतीला कधी दमल्याची, कंटाळल्याची जाणीव होत नसे.
 कधी राम म्हणायचा, " कधीतरी तुला सुट्टी द्यायला पाहिजे खरं म्हणजे. मी म्हणजे अगदी गुलामासारखं राबवतो तुला. चांगल्या मोठ्या शहरातनं ह्या खेड्यात तुला आणून टाकलं न त्याची भरपाई म्हणून काय दिलं, तर सारखं काम काम काम."
 " पण मला काम करायला आवडतं, राम."
 " खरंच आवडतं का? नाहीतर एक दिवस तुला जाग येईल, कसलं हे कंटाळवाणं आयुष्य असं वाटेल, नि जाशील पळून."
 " कुठे पळून जाईन, उदाहरणार्थ ? " हे तिनं मजेमजेनंच विचारलं. आपण एक महत्त्वाचा प्रश्न उभा करतोय, असा विचार तिच्या मनाला शिवलाही नाही आपण रामला सोडलं तर आपल्याला जायला ठिकाण नाही आणि करायला काम नाही हे तिनं नकळत गृहीतच धरलं होतं. लग्न केलं तेव्हा हा माणूस, हे घर, हे कार्यक्षेत्र सगळं एकत्र तिच्या झोळीत पडलं होतं. आणि आता रामला सोडायचं म्हणजे बाकी सगळंही तिला सोडावं लागणार होतं. हे एकत्र बांधलेलं गाठोडं आहे, घ्यायचं तर सबंध उचल नाहीतर सगळंच ठेवून चालती हो. हे खरं म्हणजे किती अन्याय्य होतं.
 तिच्या मनात आलं, आयुष्यात बदल का घडतात? पुष्कळ कारणांमुळे, पण मुख्य म्हणजे ते कुणाला तरी हवे असतात म्हणून. रामला हे बदल घडायला हवे होते. जिथे ती सुखासमाधानाने राहू शकत होती, तो त्याच्या दृष्टीने फक्त शिडीचा पहिला पायटा होता. अर्थात तो महत्त्वाकांक्षी आहे याची तिला नेहमीच जाणीव होती. तो नेहमी वाढ, विस्तार, नवनव्या योजना ह्याबद्दल बोलायचा, आणि तिला त्याच्या गप्पा ऐकायला आवडायचही.

४८ : साथ