पान:साथ (Sath).pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

जायची. नवरा दारू पिऊन पडायचा. थोरला एक मुलगा होता तो लहर लागली तर काम करायचा, नाहीतर बसून खायचा. दोन शाळकरी मुलं होती. आई न मुलीच्या मिळकतीवर घर चाललं होतं. त्यांच्यातल्या एकीनं घरी रहायचं थोडे दिवस म्हणजे उपासमारीचीच पाळी. पण तरी कामातनं मधेच इतक्यांदा बाहेर जायची तिला परवानगी देणं शक्यच नव्हतं. ती मधेमधे नाहीशी झाल्यामुळे कामाची लय बिघडून सगळ्यांचीच कार्यक्षमता कमी होत होती. शिवाय तिला परवानगी दिली की इतरांना नाही म्हणणं शक्य झालं नसतं. अडचणी सगळ्यांच्याच होत्या. पण त्यांचा कामावर परिणाम होऊ देऊन चालण्यासारखं नव्हतं. मग लवकरच ज्योती दोन निरनिराळ्या पातळ्यांवर जगायला शिकली. एक वैयक्तिक पातळी, जिथे ती बायांशी बोलायची, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायची, त्यांना शक्य तेवढी मदत करायची. दुसऱ्या पातळीवर ती फक्त धंद्याच्या दृष्टीने विचार करायची. इथे फक्त कार्यक्षमता आणि नफ्याचं प्रमाण एवढेच निकष होते. ही तारेवरची कसरतच होती. पण तरी रामसारखं ती वागू शकत नव्हती. तिच्या पद्धतीने काम करण्याचा एक परिणाम म्हणजे तिनं शिस्त लावण्यासाठी पाऊल उचललं की, त्या बाया चिडायच्या आणि आपला राग तिला जाणवेल अशा तऱ्हेने व्यक्त करायच्या. पण मालक-नोकर संबंधातली एक अटळ बाब म्हणून ते ती पचवायला शिकली. एकूण तिच्या नव्या आयुष्यात ती इतकी रमली होती की, हे छोटंसं शल्य तिला फार वेळ खुपत नसे.
 तिला सगळ्यात जर कशाचा आनंद होत असला तर तो म्हणजे तिचं काम आणि वैयक्तिक आयुष्य ज्या तऱ्हेने एकमेकांत गुंफलं गेलं होतं त्याचा. तिचं आयुष्य वेगवेगळ्या एकमेकांशी काही संबंध नसलेल्या पुडांत विभागलं गेलं नव्हतं. त्याचे निरनिराळे भाग एकमेकांत सुरेख मिसळून त्यांचा एकत्रित प्रवाह झाला होता. घर, शेत, बियाणाचा धंदा ह्यांत इकडून तिकडे करताना दुभाजक ओलांडल्याचा प्रत्यय तिला येत नव्हता. आणि

साथ:४७