पान:साथ (Sath).pdf/51

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " असं का विचारतेस ?" त्याने खऱ्याखुऱ्या आश्चर्यानं विचारलं.
 " संजय आणि निशा इथे आलेत ते तुला फारसं आवडलं नाहीसं दिसतंय."
 " असं कुणी सांगितलं? मला न आवडण्याचं कारणच काय?"
  हळूहळू ज्योतीच्या लक्षात आलं की, ही त्याची पाहुण्यांशी वागायची रीतच होती. त्याच्या स्वतःच्या नातेवाइकांशीही तो तसाच वागायचा. संजय आणि निशाकडे दुर्लक्ष केलं ह्यात त्यांचा अपमान करण्याचा त्याचा मुळीच हेतू नव्हता. अगदी जवळच्या लोकांशीसुद्धा कसं वागावं, हेच त्याला समजत नसे. ह्याला अपवाद फक्त ती एकटी. अर्थात या गोष्टीला तिच्या लेखी फार महत्त्व होतं.
 ह्यानंतर तिनं कुणालाच परत शिरगावला बोलावलं नव्हतं. रामच्या वागण्यामुळे नव्हे, पण तिचं तिलाच पूर्वाश्रमीच्या सगळयांपासून आपण फार दूर आहोत, असं वाटायला लागलं. कॉलेजातल्या मैत्रिणी लग्नं करून दूर दूर पांगल्या होत्या, आणि बँकेतल्या सहकाऱ्यांशी झालेली ओळख फारच वरवरची होती. आपल्या नव्या घरी आवर्जून बोलवावं, असं कुणीच नव्हतं. संजय-निशा येऊन गेल्यावर ते आणि आपण अगदी वेगवेगळ्या जगांत राहतो हे तिला उमजलं. तिच्या आयुष्याचे सगळे संदर्भच इतके वेगळे झाले होते, की तिच्यात आणि त्यांच्यात देवाण-घेवाणसुद्धा अवघड झाली होती.
 ज्योती इतरांपेक्षा वरचढ असण्यात काही विशेष अभिमान बाळगणाऱ्यांतली नव्हती. पण आपल्याबरोबरीच्या इतर मुलींपेक्षा आपण वेगळं काहीतरी करतो आहोत, त्यांच्यासारखं चाकोरीतलं आयुष्य जगत नाही, ही भावना तिला सुखवीत असे. रामला काळजी वाटायची की, तिला तिच्याबरोबरीच्या मैत्रिणी नाहीत म्हणून एकटं वाटत असेल. पण त्यांच्याकडे काम करणाऱ्यांची, विशेषकरून बायकांची सोबत तिला आवडायची. त्या तिच्या अनुभवविश्वाच्या इतक्या बाहेर होत्या, की त्यांची सुख

साथ : ४५