पान:साथ (Sath).pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आखणी न करता, गैरहिशोबीपणानं चालवून जमणार नाही. त्यासाठी कच्च्या मालाची किंमत, प्रक्रियेचा खर्च, नफ्याचं प्रमाण ह्या सगळ्यांची मांडणी केली पाहिजे. मार्केटचा आढावा घेतला पाहिजे, विक्रीसाठी योग्य प्रकारची यंत्रणा उभी करायला पाहिजे. हया सगळ्यात मला तुझी मदत हवीय."
  " माझी ?" तिनं आश्चर्यानं विचारलं, " बी. कॉम. होऊन बँकेत नोकरी करून एखादा स्वतंत्र धंदा चालवण्याची कुवत येत नाही माणसाला."
 " पण तू शिकू शकशील. पुस्तकी ज्ञान तर तुला आहे ना ? मग त्याचा प्रत्यक्षात वापर करायला सुरुवात करायची. आधी मुख्य म्हणजे रीतसर हिशेब ठेवणे. मी आणि बाबा नेहमी आता पुढल्या वर्षीपासून नीट हिशेब ठेवायचे असं घोकत आलोत. पण ते पुढलं वर्ष कधी उगवलंच नाही."
 "हं. हिशेब ठेवणं, जमाखर्च लिहिणं, हयात मात्र मी मदत करू शकेन."
 " असं बोल. आमचं काय झालं, रीतसर धंदा म्हणून आम्ही हे सुरू केलंच नाही. बाबा पुण्याहून आम्हाला लागणारं बी खरेदी करून आणायचे. मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जातींचा घेवडा. हया भागात घेवडा मोठया प्रमाणावर करतात. बाबा पुण्याला निघाले की शेजारपाजारचे शेतकरी आपल्यासाठी बी आणायला सांगायचे. एक दिवस ज्याच्याकडनं ते बी घ्यायचे तो व्यापारी म्हणाला, त्यापेक्षा तुम्ही माझ्याकडून घाऊक बी घेऊन ते किरकोळीनं इतरांना विकीत का नाही ? थोडा फायदा तरी होईल. तेव्हा ते तशी विक्री करायला लागले. मग ते इतर भाज्यांचं बी आणून त्याची विक्री करायला लागले. पुढे काही तऱ्हेच बी इथेच तयार करायला सुरुवात केली. असा हा धंदा नीट आराखडा न करता आपला वाढत वाढत गेला. आता तो रांगेला लावायचा म्हणजे कठीणच जाणार आहे, पण तुझ्या मदतीने मी ते करू शकेन. मला अगदी मनोमन खात्री आहे की, आपण दोघांनी मिळून काम केलं तर आपल्याला अशक्य असं काहीच नाही."

३६ साथ