पान:साथ (Sath).pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नवसासायासाने झालेल्या मुलाचे करावे तसे तिचे लाड करीत होता. तिच्या आठवणीत तरी तिला असं कुणी वागवलं नव्हतं, आणि त्याच्या वागण्याने ती मनोमन सुखावत होती.
 पण मुळात ती स्वप्नसृष्टीत वावरतानासुद्धा जमिनीवर पाय ठेवणारी बाई होती, आणि त्याच्या प्रेमाच्या वर्षावात न्हाताना सुद्धा त्याच्या कुटुंबातले आपल्याला कसं वागवतील, आपलं आयुष्य कशा स्वरूपाचं असेल, असल्या गोष्टी तिच्या मनात यायच्या. त्याचं गाव, घर, माणसं हयांबद्दल ती सारखे प्रश्न विचारायची. शेवटी जरासं चिडून तो म्हणाला, "ज्यांची उत्तरं थोड्याच दिवसांत तू स्वतः देऊ शकणार आहेस असे प्रश्न तू मला का विचारत्येयस?"
 जरासं ओशाळून ती म्हणाली, "मला फक्त मी कसं वागावं, त्या लोकांची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, याची कल्पना हवीय. त्यांचं प्रथमच माझ्याबद्दल वाईट मत होऊ नये."
 तो हसून म्हणाला, "तुझ्याशी लग्न त्यांनी नाही केलं, मी केलंय. आणि तू काहीही केलंस तरी माझं मत काही तुझ्याबद्दल वाईट होणार नाहीये. मग इतर कुणाशी तुला काय देणं-घेणं आहे ?"
 पण त्याच्या बोलण्यानं ज्योतीचं पुरेसं समाधान झालं नव्हतं. तिला वाटलं, असं सगळेच नवरे हनीमूनवर असताना म्हणत असतील. पण पुढे काय ? पुढे ते बोलले तसं करतात ? लग्न झाल्यावर वर्षभराने तुझा फक्त माझ्याशी संबंध आहे, दुसऱ्या कुणाशी काही देणं-घेणं नाही असंच म्हणतात ?

साथ:२१