पान:साथ (Sath).pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 रामला पॉइंट जास्त आवडायचे. झाडांच्या दाटीत त्याला घुसमटल्यासारखं व्हायचं, आणि काही देखावाही दिसायचा नाही. त्याला आवडायचं एखाद्या उंच टोकावर मोकळं उभं राहून पायाशी पसरत क्षितिजापर्यंत जाणाऱ्या दऱ्याखोरी आणि डोंगरांच्या रांगा पहायला. संध्याकाळी बाँबे पॉइंटलासुद्धा जायला आवडायचं त्याला. तो आइस्क्रीम नि भेळपुरीच्या गाड्या, दूर अरबी समुद्रात बुडणारा सूर्य भावपूर्ण नजरेने पहाणारे मुंबईकर आणि त्यात काही रस नसलेली भाडोत्री घोड्यावरून फेऱ्या मारणारी त्यांची पोरं ह्यांच्या गर्दीने काबीज केलेला असला तरी.
 ज्योतीला पॉइंटही आवडायचेच. तिनं हनीमूनला आली असताना प्रथमच जेव्हा एकेक पॉइंट आणि तिथनं दिसणारा देखावा पाहिला तेव्हा ती रोमांचित झाली होती. त्या वेळी महाबळेश्वरचं सगळंच जादूचा स्पर्श झालेलं वाटलं होतं तिला, तिथली हवा, तिथल्या जंगलातल्या पायवाटा, तिथून दिसणारे श्वास रोखायला लावणारे देखावे. सूर्यास्तानंतर खालच्या दरीतून तरंगत तरंगत धुकं वर येऊन आसमंतात पसरलं की, सगळ्याभोवती एक गूढतेचं वलय निर्माण व्हायचं. मग तिला वाटायचं की, आपण एका स्वप्नातल्या जगात वावरतोय आणि ते सकाळी सूर्यकिरणांच्या स्पर्शाने विरून जाणार आहे.

 तिने आणि रामने हे आपलं खास ठिकाण बनवलं होतं. जगापासून लांब पळण्यासाठी, रोजच्या धकाधकीने शिणलेल्या शरीराला आणि मनाला तजेला देण्यासाठी. दरवर्षी एखादा आठवडा तरी ते हॉलिडे कँपमधे येऊन राहायचे कामाचा व्याप जसा वाढला तसे ते हॉटेलमध्ये राहायचे म्हणजे मग आधीपासून बेत आखायचे, खोलीसाठी अर्ज करायचा, ह्या कटकटी कराव्या लागायच्या नाहीत. अलीकडे काही वर्ष ते महाबळेश्वरातल्या सर्वांत अलिशान आणि सर्वांत महागड्या ब्लू व्हॅली होटेलमध्ये यायला लागले होते. पण ह्या सगळ्या प्रगतीच्या टप्प्यात मधे कुठेतरी महाबळेश्वरच्या सुट्टीतली जानच हरवली होती. एखादं अनिवार्य कर्मकांड करीत असल्यासारखं ते पॉइंट्सवर जायचे,

साथ : १३