पान:साथ (Sath).pdf/182

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटलं नव्हतं. आणि मग तिला उमजलं की हे अटळ आहे. तिच्या बापाच्या शेवटच्या आजारपणात न कंटाळता त्याची शुश्रूषा करणारी आई तिला दिसली. हे केवळ प्रेम आणि निष्ठेच्या पोटी नसतं. इथे एक भूमिकांची अदलाबदल झालेली असते. पुरुष पहिल्यापासून वरचढ असतो, आघाडीवर राहून जगाला तोंड देतो आणि देत देत संपून जातो. तडफदार तरुण अशी त्याची प्रतिमा मध्यमवयात तडफदार राहात नाही. यशाचं शिखर गाठण्यासाठी आवश्यक असलेले त्याचे गुण आयुष्याच्या उतरणीला लागल्यावर गैरलागू, प्रसंगी हास्यास्पदही ठरतात. आणि ह्याचवेळी बाईच्या बाबतीत उलटं घडत असतं. ती दुय्यम भूमिका स्वीकारते. अगदी ज्योतीसारखी नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून अंगचोरपणा न करता काम करणारी बाईसुद्धा दुय्यम भूमिकेतच राहाते कारण निर्णय घेण्याचा, अंतिम जबाबदारी स्वीकारण्याचा भार तिला पेलावा लागत नाही. आणि तिला आधार देणाऱ्या, लाडाने, कौतुकाने, प्रसंगी तुच्छतेने वागवणाऱ्या, अपमानितसुद्धा करणाऱ्या तिच्या नवऱ्याला एकाएकी तिच्या आधाराची गरज वाटायला लागते. सर्वशक्तीनिशी आयुष्य न जगता ती चिवटपणा, कणखरपणा, शहाणपणा ह्यांचा कणाकणाने संचय करून ठेवते, आणि आयुष्याच्या संध्याकाळी जास्त समर्थ बनते. मग तिच्या सहचराबद्दल वाटत असलेल्या आदराची, धाकाची जागा मायेने, अनुकंपेनेसुद्धा घेतली जाते. जेवण वाढून घेऊन ती दोघं जेवायला बसली. तो म्हणाला, " हे जेवण काही पार्वतीनं शिजवलेलं नाहीये."
 " नाही."
 " पण मी तिला जायच्या आधी स्वैपाक करून जा म्हणून सांगितलं होतं.”
 " ती जरा घाईत दिसली, तेव्हा मीच तिला जायला सांगितलं."
 " तरी पण तिनं स्वैपाक तुझ्यावर टाकायला नको होता."
 " राम, एका वेळचं जेवण शिजवल्यामुळे माझं काही बरंवाईट होणार नाहीये," ती चिडूनच म्हणाली.

साथ : १७५