आयुष्यावर गेली तीस वर्ष प्रभाव होता अशा ह्या माणसाबद्दल मला नक्की काय वाटतं? प्रेम? पण प्रेम म्हणजे तरी काय ? ते निरनिराळ्या माणसांच्या लेखी निरनिराळं असू शकतं. त्याच माणसालासुद्धा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळं भासतं. दोन माणसांतल्या नात्याचं वर्णन करायला प्रेम हा शब्द पुरेसा नाही. तुम्ही असं म्हणू शकत नाही की मी अमक्याबरोबर राहते कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. तुम्ही कुणाबरोबर तरी राहता ह्याचं कारण एकमेकांशी अमुक नातं असलेली दोन माणसं एका घरात राहतात अशी परंपरा आहे. हे कुठलं नातं? प्रेमाचं नातं एवढं म्हणून भागत नाही. मग काय ? एकमेकांवर अवलंबित्व ? एकमेकांबद्दल आदर ? एकमेकांची कदर ? पण हयातल्या कुठल्याही भावना एकमेकांविषयी वाटत नसूनही दोन माणसं एका छपराखाली राहू शकतात, रहातात. माझ्या मनात रामविषयी राग, द्वेष असं काही नाही. मला त्याला सोडून जायचंय कारण त्याच्याबरोबर राहून मला सुख, शांती मिळू शकत नाही. एवढंच.
त्यांच्या एकत्र आयुष्याला वेगळं वळण देण्याचा तिनं प्रयत्न केला नाही हे तिचं चुकलं का ? पण तिला हवं तसं वळण तिनं दिलं असतं तर मग तो असुखी झाला असता. त्यांना मुळी आयुष्यात अगदी वेगळ्याच गोष्टी हव्या होत्या त्याला काय करणार? त्याला हवंय ते सगळं त्याला मिळालं, त्यानं घेतलं. पण तिला हवं असलेलं बरंच काही तिच्या हातून निसटून गेलं. आणि आता ते परत मिळवणं शक्य नव्हतं. ही साधीसोपी गोष्ट त्याला समजावून सांगणं इतकं का कठीण होतं ?
ती म्हणाली, " हात – तोंड धुऊन जेवायला येतोस ना?"
तो जेवायच्या टेबलाशी आला तेव्हा ती म्हणाली, " तुझ्या पँटचं झिपर लागलेलं नाहीये."
"ओ." त्यानं झिपर वर ओढलं. त्याचा चेहरा जरासा ओशाळवाणा झाला. त्या क्षणी तिला तो एकदम लहान मुलासारखा अगतिक, जगाचा प्रतिकार करायला असमर्थ असा भासला. हा नवीनच अनुभव होता कारण तिला त्याच्याबद्दल असं कधीच
पान:साथ (Sath).pdf/181
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१७४ : साथ