पान:साथ (Sath).pdf/175

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

येतेय म्हणून सांगेन त्याला. पण मग तो त्याचा अर्थ नक्कीच नको तो लावील.
  फोन विनीचा होता, आणि ज्योतीनं सुटकेचा नि:श्वास सोडला. पण लगेच तिला वाटलं, विनी फोन कशासाठी करणार ? रामला काहीतरी झालं असेल. तो आजारी बिजारी असेल. देवा, असं असू नये.
 विनी म्हणाली, " ज्यो, काय चाललंय हे सगळं ?"
 " म्हणजे?"
 " तू पेपर वाचला नाहीस का?"
 " गेल्या काही दिवसांचे नाही वाचले. का?"
 " त्रिवेणी सीड्सने खराब बी विकलंय अशा बातम्या आहेत. शेतकऱ्यांनी पुष्कळ तक्रारी केल्यायत उगवण होत नाही म्हणून, आणि सरकारने चौकशी सुरू केलीय. आणि आता मी अशा वावड्या ऐकल्यात की त्रिवेणीचं दिवाळं निघतंय."
 " शक्य नाही, विनी. हे धादांत खोटं आहे."
 " मी फक्त तुला लोक काय म्हणतायत ते सांगतेय. लोक म्हणतायत राम फ्लॅट विकतोय पैसे उभे करायला."
 " हे सगळंच अशक्य कोटीतलं आहे. एनी वे, मी आज घरी जातेच आहे, तर काय प्रकार आहे तो कळेलच. फोन केल्याबद्दल थँक्स."
 " आज येत्येयस तू इकडे ? मग फार बरं झालं."
 " तुला वाटतंय तो त्याचा अर्थ नाहीये."
 " लोक असंही म्हणतायत की कंपनी बुडतेय म्हणून तू रामला सोडलंयस."
 " नॉनसेन्स."
 " मला माहीताय ग. पण लोकांना नुसत्या घडलेल्या गोष्टी दिसतात. त्यांच्यातून ते त्यांना वाटेल तो अर्थ काढणार. "
 " विनी, तू मला ब्लॅकमेल करत्येयस. लोक काय वाटेल ते बोलतील. म्हणून मी माझा निर्णय बदलावा असं तुझं म्हणणं आहे ? केवळ लोकांखातर ? लोक कोण लागतात माझे ? फार

१६८ : साथ