पान:साथ (Sath).pdf/173

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

असा पायंडाच पडून गेला. तशी त्याच्या निर्णयापुढे मान तुकवण्याची तिला कोणी- त्याने सुद्धा – सक्ती केली नव्हती, तिनं आपणहूनच काही उलटसुलट विचार न करता हा मार्ग पत्करला होता. मग आता तिला त्याचं ओझं का वाटत होतं ? कारण ती बदलली होती? की राम बदलला होता?
 अर्थात हे शक्य होतं की माणसं बदलत नाहीत, आणि राम आज जसा होता तसाच पहिल्यापासून होता. पण काहीतरी बदललं होतं यात शंका नव्हती. परिस्थिती बदलली होती, म्हणून संदर्भ बदलले होते. कणखरपणा, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा आणि ती पुरी करण्याच्या मार्गात येणारे अडथळे लाथाडून जाण्याचा बेगुमानपणा हे शिडीच्या पहिल्या पायट्यावर उभ्या असलेल्यात गुण समजले जातात, पण शेवटच्या पायट्यावर सुरक्षितपणे आरूढ झालेल्यात नाही. ज्याला यश मिळालेलं आहे त्याचा कणखरपणा म्हणजे प्रसंगी संवेदनाशून्यता वाटायला लागते, आणि त्याची महत्त्वाकांक्षा म्हणजे हाव. अशी कुठलीच जागा नव्हती की जिथे राम म्हणणार होता, पुरे, आता मी जिथे जायला निघालो तिथे पोचलो. ज्योतीला हे समजू शकत नव्हतं. एखाद्या घृणास्पद माणसाला मोठ्या अगत्याने घरी जेवायला बोलवून शिवाय तिनं कुरकूर केली की, " त्यात काय आहे ज्यो? हे नुसतं धंद्यासाठी आहे. व्यवहाराचा भाग आहे हा " असं म्हणणारा राम तिच्या पचनी पडू शकत नव्हता.
 विनी म्हणाली तसं ती रामबरोबर ह्या सगळ्याबद्दल बोलली असती तर कदाचित गोष्टी ह्या थराला आल्या नसत्या. पण आता त्याला फार उशीर झाला होता. एकदा तिनं बिनतक्रार त्याच्या पावलावर पाऊल टाकण्याची, त्यानं केलेला निर्णय पटला नाही तरी त्याविरुद्ध फारसा मोठा आवाज न उठवण्याची, त्यानं केलेल्या माफक कौतुकातच सार्थक मानण्याची भूमिका स्वीकारल्यावर खऱ्याखुऱ्या संवादाचा मार्गच खुंटला होता. त्यांचं नातं ह्याच पायावर उभारलं गेलं होतं आणि वर्षानुवर्ष एकत्र राहिल्यामुळे, काम केल्यामुळे ते जास्त जास्त जोमदार आणि

१६६ : साथ