पान:साथ (Sath).pdf/168

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती अनुत्सुक असे. तिच्या जागी विनी असती तर तिनं रागारागाने पुष्कळ बडबड केली असती, अतुलला शेलकी विशेषणं बहाल केली असती. पण अतुलला सोडून बिडून जाण्याचा विचार केला नसता. परिस्थितीनं घातलेल्या मर्यादांच्या आत आपल्याला काय हवं ते तिला नेमकं माहीत होतं. अतुल कसाही असला तरी तो तिला एकाकीपणा, कंटाळवाणं किंवा कष्टाचं आयुष्य यांच्यापासून दूर ठेवीत होता. त्याच्याशिवायचं खडतर आयुष्य ती कल्पूच शकत नव्हती. तेव्हा ती जरूर त्या तडजोडी करायची, पण त्या करताना आलेला कडवटपणा, संताप, वैताग हयांना ती खुलेपणाने वाट करून देऊन स्वत:चा मानसिक तोल राखायची. कदाचित हा जास्त शहाणपणाचा मार्ग असेल, पण आपण तसं वागू शकणार नाही अशी ज्योतीची खात्री होती.
 ती म्हणाली, " थॅंक यू, विनी. तुझ्यापासून काही लपवायचंय - असं नाही. काही सांगायचं-विचारायचं असलं तर तुलाच. तूच तेवढी माझी जवळची मैत्रीण आहेस. पण आत्ताच्या परिस्थितीत तू मदत तरी काय करू शकणार ?"
 एकाएकी ज्योती रडायला लागली.
 " काय झालं ज्यो? सांग ना मला. नुसतं बोलून सुद्धा कधी कधी हलकं वाटतं.”
 " सॉरी. तुझ्यासमोर रडायबिडायचा इरादा नव्हता माझा. तुझ्याकडून मदत मागण्यासारखं काही राहिलंच नाहीये. मी रामला सोडून जात्येय, विनी."
 " अशक्य. मी हयाच्यावर विश्वास ठेवणं शक्य नाही."
 विनयाचा धक्का बसलेला चेहरा पाहून ज्योतीला हसू आलं.
 " तुला विश्वास ठेवावाच लागेल. "
 "पण-मला काही कळेनासं झालंय. तुमचं लग्न म्हणजे नेहमीच्या नियमाला अपवाद आहे. प्रत्येकाच्या स्वप्नातलं आदर्श लग्न."
 " मग ते इतकं आदर्श असतं तर लग्न झाल्यानंतर तीस वर्षांनी आज मला आयुष्यात जे हवं होतं ते सगळं माझ्या हातून

[११]

साथ: १६१