पान:साथ (Sath).pdf/166

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तिला कंटाळा यायचा. ह्या संभाषणांतून नवीन काहीच निष्पन्न होत नसे. तीच तीच वाक्यं उगाळली जायची, तेच तेच किस्से सांगितले जायचे, आणि या सगळ्यात आपल्या देशाचं सरकार मूर्ख आहे, आम्ही किती शहाणे आणि सर्वज्ञ आहोत, आम्हाला संधी दिली तर आम्ही सरकारला योग्य दिशा दाखवू, अशी उबग आणणारी आत्मतुष्टता असायची.
 फक्त विनीनं पृष्ठभागाखाली बुडी मारून ज्योतीचा शोध घेण्याइतपत कुतूहल दाखवलं होतं. ज्योती वेगळ्याच वातावरणातून आली असल्यामुळे आपल्यासारख्या लोकांच्यात वावरताना जरा बुजते, दबकते हे तिनं हेरलं, आणि हळूहळू ज्योतीला कुठे कसले कपडे घालायचे, तोंडाला मेकप कसा लावायचा, पार्टीत हलकफुलकं संभाषण कसं करायचं, महागड्या रेस्टॉरंटमधे जणू काही आपण त्यातले मुरब्बी आहोत अशा ढंगाने जेवणाची ऑर्डर कशी द्यायची हे सगळं शिकवलं. मात्र शिकवीत असताना आपण फारच गावढळ आहोत असं ज्योतीला तिनं भासू दिलं नाही. ज्योती बऱ्यापैकी तयार झाल्यानंतर सुद्धा धंद्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या पण वैयक्तिक पातळीवर ज्याच्याबद्दल आपल्याला काडीचीही आत्मीयता वाटत नाही अशा माणसासाठी कसली आणि कितपत किमती भेटवस्तू घ्यायची, परदेशीयांना जेवायला बोलावलं की जेवणाचा बेत काय ठेवायचा असल्या बाबींबद्दल विनीचा सल्ला घेत असे.
 आता विनी तिला विचारीत होती, " मग राम का नाही आला तुझ्याबरोबर ?"
 " बरंच काम आहे. आम्हाला दोघांना एकदम निघून येणं शक्यच नव्हतं."
 " अच्छा मग, आम्ही परत गेल्यावर रामला फोन करून सांगते तू भेटली होतीस म्हणून."
 अतुल म्हणाला, " ए चल, विन. दिवसभर इथे रस्त्यात गप्पा मारीत उभी राहणार आहेस का?"
 तरी विनी थोडीशी घोटाळली. " ज्यो, तू होटेलला परत जात

साय: १५९