पान:साथ (Sath).pdf/165

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तक्रारी. मी लक्षच दिलं नाही. तर मग अतुल माझी टर उडवायला लागला. मुद्दाम मुलांसमोर म्हणायचा, चेतन, तेवढी पालकची भाजी संपवायची बरं का पानातली. अरे, ही अगदी खास भाजी आहे. तुझी आई आपल्यावर जेवढा करत नाही तेवढा प्रेमाचा वर्षाव त्या भाजीवर करते, माहीताय ? हे असं टोचून खोचून बोलणं सारखं चालायचं. शेवटी मला असहय झालं. त्याच्याकडे कानाडोळा करीत माझं काम चालूच ठेवण्याइतकी निगरगट्ट होऊ शकले नाही मी."
 ज्योतीला माहीत होतं की, तू असल्या दबावाला बळी पडता कामा नये असं विनीला सांगणं सोपं होतं. पण ह्या दबावतंत्राविरुद्ध अखंड लढत राहणं किती अवघड आहे ह्याची तिला कल्पना होती. शिवाय ती जाणून होती की स्वतःची अस्मिता जागी ठेवण्याच्या अट्टाहासापायी आपल्या वैवाहिक जीवनाची चौकट उद्ध्वस्त करून टाकायला विनी कधीच तयार झाली नसती. लग्नामुळे मिळणाऱ्या पैसा, सुरक्षितता, समाजातलं स्थान ह्या गोष्टी तिनं कधीच सोडल्या नसत्या.
 पुण्याला येण्याआधी ज्योतीला कुणी विचारलं असतं, की तुझी जिच्याशी मैत्री होणं अशक्य कोटीतलं आहे अशी बाई कुठली तर तिनं विनीकडे बोट दाखवलं असतं. पण तरी तिची आणि विनीची मैत्री झाली होती. ज्योतीच्या धावपळीच्या दिनक्रमात खरं म्हणजे कुणाशीही फारशी जवळीक होण्याइतकी घसट वाढणं कठीण होतं. त्यातून पार्ट्यांमधे वगैरे ज्या ओळखी व्हायच्या त्या सदैव वरवरच्या राहायच्या, एकाच पातळीवर राहायच्या. कुणाशीच वैयक्तिक संबंध राहात नसे. शिवाय ज्योतीला ह्या सगळ्या लोकांच्यात उपरं वाटायचं. टीव्ही दुरुस्त करणाऱ्यांची वानवा, भारतात बनवल्या जाणाऱ्या मोटारीचा सुमार दर्जा, कॅपिटल गेन्स टॅक्सचे जाचक नियम ह्या त्यांच्या संभाषण-विषयांत ज्योतीला फारशी गोडी नव्हती. ह्या विषयांत तिला अजिबात रस नव्हता किंवा तिची मतं त्यांच्यापेक्षा वेगळी होती असं नव्हे, पण चार लोकांत असल्या फालतू विषयांचं चर्वितचर्वण करण्याचा

१५८: साथ