पान:साथ (Sath).pdf/164

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

यलाच कुणी तयार नसतं."
 " मग तू दुसरं काहीतरी करीत का नाहीस?" ज्योतीनं विचारलं.
 " काय करणार? मला काहीच करता येत नाही. माझ्या पदरात फक्त एक यूसलेस बी. ए. डिग्री आहे. शिवाय कामाला जरी माणसं असली तरी इतर सगळं मलाच पहावं लागतं. त्यातनं पार्टटाईम नोकरी करायलासुद्धा वेळ नसतो. रोज अमुक वेळ मला मोकळा मिळेल असं काही मी धरून चालू शकत नाही."
 " नोकरीच केली पाहिजेस असं नाही. पण फावल्या वेळात काहीतरी हॉबी किंवा काही वस्तू बनविणं असं काही घरकामाशी ज्याचा संबंधच नाही असं करायला काय हरकत आहे ?"
 " वस्तू ! म्हणजे उदाहरणार्थ कागदाची फुलं, लोणची, ॲक्रिलिकने रंगविलेल्या साड्या असलं ? अतुल तर हसतच सुटेल मी असं काही करायला लागले तर."
 " हसायचं काय कारण? काही नाही, तुला आपलं उगीच वाटतं. आपण कुठलीही गोष्ट मनापासून करून त्यात यश मिळवलं की कुणी हसत नाही."
 " पण मग मला आताच्या दुप्पट काम पडेल. सगळेच नवरे काही रामसारखे नसतात, बायको बाहेर काम करतेय तर तिला घरी कमी काम पडावं म्हणून झटणारे. उलट माझ्या नवऱ्याला जरा जरी शंका आली की बाहेरच्या कामामुळे बायको घरकामात अंगचोरपणा करतेय तर तो मला तसं पदोपदी ऐकवील. मला बागकामाची आवड आहे तुला माहीताय ? मी भाजीबाग करीत असे आणि घरगुती भाजीबाग लावणाऱ्यांची एक संघटना आहे, तिची मेंबर पण झाले होते. दर रविवारी सकाळी आमच्या सभा असायच्या आणि पुष्कळदा अतुल आणि मुलं उठायच्या आत मी बाहेर पडायची. तर ब्रेकफास्ट करून द्यायला मी नसे म्हणून कोण धुसफूस चालायची. म्हणजे अतुलला हातानं करून घ्यायला लागत नसे, पण रविवार म्हणजे स्पेशल दिवस, तर आम्हाला स्वैपाकिणीच्या हातची ब्रेकफास्ट खावी लागते म्हणून

साथ : १५७