पान:साथ (Sath).pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

राम म्हणाला तिथे राहून विश्रांती मिळणं अशक्य आहे. घरी जरी राहिले तरी काहीतरी निघतं, मग ऑफिसमधे जाणं होतं. तेव्हा त्यानं मला तिथनं हाकलूनच दिलं."
 ज्योतीला वाटलं, आपण खुलासा जरा अतीच पाल्हाळ लावून केला. तिला खोटं बोलण्याची गरज का भासली हे तिचं तिलाच कळेना. विनया तिची बरीच जवळची मैत्रीण होती, आणि कुठेतरी पाणी मुरत असलं की त्याचा अचूक वेध घेण्याची कला तिला अवगत होती. तेव्हा शेवटी तिनं सत्य शोधून काढलंच असतं. शिवाय ज्योतीनं रामशी फारकत घ्यायचं ठरवलं असतं तर ते त्यांच्या मित्रमंडळीत पसरायला वेळ लागला नसता. तरी पण आपोआपच तिच्या तोंडून असत्य बाहेर पडलं.
 विनी म्हणाली, " नशीबवान आहेस. माझा नवरा माझी इतपत चिंता वाहणारा असता तर !"
 अतुल म्हणाला, " रामला तिची चिंता वाहावीच लागते, कारण ती त्याच्यासाठी महत्त्वाचं काम करते."
 " आणि मी जे करते ते महत्त्वाचं नसतं अर्थातच,” विनी म्हणाली. तो नुसताच मोठ्याने हसला. विनी म्हणाली, " गृहिणीची शोकांतिका. ती जे करते त्याला काम म्हणायला कुणाची तयारी नसते."
 डोळे फिरवीत ओठ मुडपून ती हसली, पण ज्योतीने तिच्या तोंडावरनं भर्रकन निघून गेलेला राग आणि दुःख पाहिलं होतं. तिच्या ओळखीची कितीतरी जोडपी असं वागताना तिनं पाहिली होती. वरवर असं हसत - खेळत भांडण करायचं, पण ओरबाडणं मजेत असलं तरी त्यानं रक्त निघायचं ते निघतंच.
 ज्योती घराबाहेर काम करते म्हणून विनयाला नेहमीच तिचा हेवा वाटत असे. ती म्हणायची, “घरकाम करणाऱ्या बायकांबद्दल कुणालाच आदर वाटत नाही. तसं मी कबूल करते की मी प्रत्यक्ष कष्ट फारसे करीत नाही, कारण माझ्याकडे नोकरचाकर आहेत पण नसते, आणि सगळं काम मी स्वतःच केलं असतं तरी काही फरक पडला नसता. घरकामाला काम म्हणा-

१५६ : साथ