तुला खरंच वाटतं का? विचार कर जरा. आणि भूतकाळाबद्दल नुसतंच भावनाविवश न होता नीट विचार कर."
" राम, मी-" ती बोलताबोलता एकदम थांबली कारण तिला वाटलं, आपल्याला आता रडायला येणार. आणि हया संभाषणाचा शेवट अश्रूंत होता कामा नये, असं तिनं आधीच ठरवलं होतं. तिनं हया सगळ्याबद्दल खूप दिवस आणि खूप खोल विचार केला होता, आणि त्यानं मांडलेले मुद्दे वरवर कितीही तर्कशुद्ध वाटले तरी त्यामुळे तिला जे असह्य वाटत होतं ते सह्य होणार नव्हतं.
"हे बघ ज्यो, मी एक तडजोड सुचवतो. तू एकटीच सुट्टीवर जा कुठेतरी. कबूल आहे का ? महाबळेश्वरला जा. एखादा आठवडाभर तिथे रहा. हवं तर जास्त दिवस: तुला जितकं पाहिजे तितकं रहा. आणि नीट सगळ्या बाजूंनी विचार कर."
खरं म्हणजे त्यानं सुचवलं होतं त्यात गैरवाजवी काहीच नव्हतं. त्यानं फक्त आणखी थोडासा वेळ मागितला होता आणि तो देणं तिला भाग होतं. काहीतरी कुठेतरी बिनसलंय एवढं जरी त्याला कळलेलं असलं तरी ते एकदम असं स्वरूप घेईल याची त्याला कल्पना आलेली नसणार.
ती म्हणाली, " ठीक आहे. मी जाते थोड्या दिवसांसाठी."
" कुठे जाशील ? महाबळेश्वरला? मी ब्लू व्हॅली हॉटेलला फोन करून तुझ्यासाठी खोली रिझर्व्ह करतो. किती दिवसांसाठी करू ? एक आठवड्यासाठी ? अर्थात नंतर तुला वाढवून घेता येईल. सुदैवाने अजून सीझन सुरू व्हायला वेळ आहे तेव्हा जागा मिळण्यात काही अडचण यायची नाही."
कशाला एवढी कटकट करायची? मी आपली जाईन नि जागा मिळेल तिथे राहीन.”
" त्यात कटकट कसली? सकाळी उठल्याउठल्या फोन लावीन. तू किसनला घेऊन फियाट घेऊन जा नि गाडी तिथेच ठेव."
" मला वाटतं बसनं गेलेलं बरं."
"बस?" तिनं असं काही म्हटलं हे त्याला खरंच वाटलं नाही. "काहीतरीच काय? इथे दोन गाड्या नुसत्या उभ्या असताना