पान:साथ (Sath).pdf/151

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धक्काच बसला. तिच्या चेहऱ्याकडे पाहून रामचा उद्रेक जितका चटकन उफाळला तितक्याच लवकर शमला. तिला जवळ घेत तो म्हणाला, “ आयॅम सॉरी. तू रहा इथे निश्चिंतपणे. मी तिकडचं सगळं बघतो. तुला रहायचंय तितके दिवस रहा.
 ती स्मिताकडे गेली तेव्हा स्मिता जागीच होती. म्हणाली, " ममी, तू जा परत शिरगावला. मी राहीन आजीपाशी."
 रडणं नाही, विनवणं नाही. समजूतदारपणासुद्धा इतक्या कोरडेपणानं दाखवलेला की तो लहान मुलाचा समजूतदारपणा वाटू नये.
 ज्योती म्हणाली, " मी रहाणार आहे इथंच."
 " माझ्यासाठी काही रहायला नको."
 " तुझ्यासाठी नाही, मला हवंय म्हणून मी रहातेय."
 मग मात्र तिला मिठी मारून स्मिता हमसाहमशी रडली. जणू शारीरिक वेदना, मानसिक धक्का या सगळ्याचं ती एकदम रडून घेत होती.
 ज्योतीच्या मनात आलं, राम म्हणाला तुला रहायचंय तितके दिवस रहा. स्मिताला तुझी गरज आहे तोवर रहा असं नाही म्हणाला. मुलांच्या काही खास गरजा असतात हे त्यानं कधी मानलंच नव्हतं, आणि त्यांच्या तिच्याकडून काही अपेक्षा असतात असंही. तिनं फक्त त्यांना जन्म द्यायचा. मग बाकीचं सगळं करायला इतरजण असतात. त्यांना खाऊपिऊ घालणं, त्यांची दुखणी काढणं, त्यांना शिकवणं हे सगळं. तिला जर कधी असं वाटलं की मुलांना आपली, आपण त्यांच्यापाशी असण्याची, त्यांचं काही करण्याची गरज आहे, तर तो तिच्याशी वाद घालून तिला पटवून द्यायचा की ह्या नुसत्या परंपरागत कल्पना आहेत. मुलांचं सगळं व्यवस्थित झालं म्हणजे पावलं, मग ते आईनं स्वतः जातीनं राबूनच केलं पाहिजे असं नाही. तिचं प्रेम, तिची निष्ठा, वेळ, शक्ती या सगळ्यांवर त्याचा अधिकार होता. तिनं नेहमी हे सगळं भरभरून त्याला दिलं होतं पण ते मुलांचं कमी करून त्याला दिलं अशी एक बोच तिच्या मनात राहून गेली.

साथ: १४३