पान:साथ (Sath).pdf/15

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " तशा तुझ्या लहानसहान बाबींबद्दल तक्रारी चालल्या होत्या, पण एकदम हा असा पवित्रा घेण्याइतपत महत्त्वाचं त्यात काही होतं असं मला वाटलं नाही. अपराध तरी काय केलाय असा मी ? का मी तुला मारतो, का उपाशी ठेवतो, का इतर कोणत्या तऱ्हेने तुझा छळ करतो?"
 त्याच्या बाळपणच्या अगदी साध्यासोप्या गृहीतांकडे झुकणारा हा प्रश्न ऐकून तिला हसू आलं. त्यात त्यानं आणखी एक कलम घालायला हवं होतं. का मी षंढ आहे ?
 " अर्थातच नाही." ती म्हणाली.
 " मग असं एकतरी कारण दे ना, की ज्यामुळे तू आपलं तीस वर्षांचं बऱ्यापैकी सुखी लग्न मोडायला निघालीयस. की ते सुखी नव्हतंच ? सुखी होतं, आहे, असं गृहीत धरलं हीच माझी चूक झाली?"
 " चूक झाली नाही, राम. ते सुखी होतंच."
 "मग का?"
 " नक्की का ते सांगायला मला नेमके शब्द सापडत नाहीयेत."
 " सांगण्याचा प्रयत्न तरी कर. मग ते माझ्या डोक्यात शिरलंच नाही तर मी मूर्ख आहे म्हणून सोडून दे."
 " सगळंच बदललंय, राम. तुला ते दिसत नाही का?"
 " अर्थातच बदललंय. हे बदल घडवून आणण्यासाठीच तर सगळा आटापिटा होता. तुला आयुष्य एका ठिकाणी थिजून रहायला हवं होतं का ?"
 " तसं नाही रे-राम, तू सगळंच फार अवघड करतोयस माझ्यासाठी."

 " अवघड मी नाही करत, तूच करत्येयस. आयुष्यात बदल घडत जाणं अपरिहार्यच आहे ज्यो. तुझं चुकलं इथेच की तू ते बदल स्वीकारले नाहीस. का ? कितीतरी बाबतीत आपलं आयुष्य आता जास्त चांगलं नाहीये? त्याचे थोडे जास्त ताणतणाव असतात, कबूल आहे मला. पण ते टाळण्यासाठी हे सगळं सोडून परत पूर्वीसारखं आयुष्य जगण्यानं आपण जास्त सुखी होऊ असं

साथ:९