पान:साथ (Sath).pdf/145

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्रिवेणी सीड्सच्या डीलर्सनी ऑर्डर केलेलं बियाणं उचललं नव्हतं. निनावी पत्रात लिहिलं होतं की वस्तुस्थिती अशी होती की त्रिवेणीचं जवळ जवळ सगळं बी खपलं होतं. अमरनं भाव कमी केले होते, डीलर्सना जास्त विक्रीवर जादा कमिशन कबूल केलं होतं आणि त्यामुळे त्याच्या जवळजवळ सगळया बियाणाचा उठाव झाला होता. अर्थात त्याने अशी पावलं उचलावीत आणि बी खपवावं हे प्राप्त परिस्थितीत अपेक्षितच होतं. पण मग त्यानं खोटे रिपोर्ट का पाठवले ? ह्याचं उत्तर एकच असू शकत होतं.
 रामने विचारलं, "अमर, विक्रीचे पैसे कुठेयत ? " त्याने आधीच चौकशी करून सगळ्या गोष्टींची खात्री करून घेतली होती. तेव्हा अमर भेटल्यावर कसलाच घोळ न घालता त्याने एकदम मुद्याला हात घातला.
 अमरचा चेहरा पांढराफटक पडला पण तो डगमगला नाही. नंतर राम म्हणाला, "पोरगा घाबरला नाही. त्याला हिंमत आहे हे कबूल करायला पाहिजे."
 ह्यातून सुटका करून घेणं शक्य नाही हे ओळखून अमरने पैसे घेतल्याचं कबूल केलं. त्याचं काय केलं हे तो सांगेना. अर्थात रक्कम एवढी मोठी होती की ती कुणा व्यापाऱ्याला व्याजाने दिली असती तरी महिन्या दोन महिन्यांत हजारो रुपये व्याज गोळा झालं असतं.
 राम म्हणाला, " तुझ्यावर फौजदारी करता येईल मला."
 " मी सगळे पैसे परत देईन."
 " केव्हा ?"
 " एका आठवड्यात.”
 "तू पैसे देशील कशावरून ? "
 " माझ्यावर विश्वास ठेवावा लागेल तुम्हाला."
 राम कडवटपणे हसला. “ विश्वास ! केवळ काही हजार रुपयांसाठी तू माझा विश्वासघात केलास. आता विश्वास हा शब्द उच्चारायचासुद्धा तुला अधिकार नाही. तू का असं केलंस अमर ? "

साथ : १३७