पान:साथ (Sath).pdf/144

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

समजूत घालायची, दुखावलेल्या अहंकारावर फुंकर घालायची. ती स्वतःला सांगायची की एक दिवस मी मधे पडायची थांबणार आहे. त्यांना एकमेकांची डोकी फोडायचीत ना ? मग फोडू दे. मी काही त्यांना थांबवायचा प्रयत्न करणार नाही. नुसती बाजूला बसून प्रेक्षकाचं काम करणार आहे.
 म्हणून तिला अमर घरी आलेला आवडायचा. तो असला म्हणजे काही ताणतणाव नसायचे. तिचे पाय जमिनीवर रोवलेले असल्यामुळे प्रताप किंवा स्मिता अमरच्या जागी असते तर असा कल्पनाविलास तिनं कधी केला नाही. ती दोघं जन्मताना जे गाठोडं घेऊन आली होती त्याच्यामुळे म्हणा, किंवा त्यांना ज्यांनी आकार दिला त्या माणसांमुळे म्हणा, जशी होती तशी झाली होती. ती तशी होणं हे अटळ होतं. मग त्याचमुळे अमरला रामच्या आयुष्यात विशिष्ट स्थान प्राप्त होणं अटळ होतं. आणि ह्याची तार्किक परिणती म्हणजे अमर जसा होता तसा होता म्हणून त्याने ह्या गोष्टीचा फायदा उठवणं अटळ होतं.
 प्रकरणाची सुरुवात एका निनावी पत्राने झाली. निनावी पत्रं ही केराच्या टोपलीत फेकून देण्यासाठी असतात असं रामचं मत होतं. पण हे पत्र नेहमीच्या निनावी पत्रांपेक्षा वेगळं होतं. नेहमी असे पत्रलेखक विनाकारण पाल्हाळ लावीत, पुनःपुन्हा तेच तेच लिहीत, आणि काहीतरी अतिशयोक्त आरोप करीत. हे पत्र थोडक्यात, मुद्देसूद होतं आणि जो आरोप केला होता तो सहज विश्वास बसण्यासारखा होता. आरोप ज्या माणसाविरुद्ध होता तो असं काही करील ह्यावर विश्वास बसत नव्हता पण पत्राचा एकूण सूरच असा होता की त्याने रामला पत्राची दखल घेण भाग पडलं. ज्योती आणि तो न कळवता अचानक कर्नाटकातल्या कंपनीच्या हेडक्वार्टर्सला गेले आणि अमरच्या गुन्हयाबद्दल काही संदेह राहू नये इतका पुरावा त्यांना मिळाला.
 कपाशीचं बी विकलं जात नाही असे त्याचे रिपोर्ट येत होते. त्यावर्षी पाऊस चांगला झाला होता आणि दोन नवीन कंपन्या आपलं बी विकण्याचा आक्रमक प्रयत्न करीत होत्या. रामच्या

१३६ : साथ