पान:साथ (Sath).pdf/143

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 " हं. तिथेच चुकलं माझं. मी तुझं ऐकायला नको होतं. सुट्टीत घरी आला की काहीतरी काम करायला लावायला हवं होतं. बी. एस्सी. झाल्यावर निदान पार्टटाइम नोकरी केली पाहिजे असा आग्रह धरायला पाहिजे होतं. त्याच्याकडून कसलीच अपेक्षा न धरता त्याला पैसे पुरवल्यामुळे त्याच्या आळशीपणाला उत्तेजन दिल्यासारखं झालं."
 " तो काही निरुद्योगी नव्हता इतकी वर्ष."
 " निरुद्योगीच नाही तर काय ? एका विशिष्ट मर्यादेपलिकडे - शिक्षण घेत बसणं म्हणजे आयुष्यातल्या जबाबदाऱ्यांपासून पळून जाणंच आहे."
 " तो संशोधन करतोय."
 " संशोधन ! कसलं संशोधन ? तुला माहीताय कशावर संशोधन करतोय ? तो कधी बोलतो त्याबद्दल ? ज्याला एखाद्या विषयात वर्षानुवर्ष संशोधन करण्याइतकी गोडी आहे तो त्याबद्दल काहीतरी बोलणार नाही ? काही न करण्यासाठी ती सबब आहे नुसती, दुसरं काही नाही. तू अमरशी तुलना करू नको पाहिजे तर, स्मिताशी कर. ती त्याच्यापेक्षा लहान आहे, अजून कॉलेजात शिकतेय. पण ती स्वतःपुरतं मिळवण्याची धडपड करते, नुसता आपल्यापुढे हात पसरत नाही."
 " ती वेगळी आहे. सगळ्यांना एकच निकष लावून कसं चालेल?"
 " तेच मी म्हणतोय. ती वेगळी आहे, स्वतंत्र वृत्तीची आहे. तिचं सगळं भंकस साम्यवादी तत्त्वज्ञान मला पटत नाही, पण तरी तिच्याबद्दल आदर वाटतो कारण ती दुसऱ्याच्या जिवावर आयतोबासारखी जगू पहात नाही."
 ते नेहमीच्या युद्धभूमीवर येऊन ठेपले होते. इथे दोन शत्रूसैन्यांच्या मधे ती सापडायची. राम आणि मुलं, राम आणि कंपनीतले कामगार. त्यांनी भांडायचं, शिव्या द्यायच्या. मन मानेल तसे आरोप करायचे, आणि तिनं एकाला पाठीशी घालायचं, एकाचं दुसऱ्याला पटवून द्यायचा प्रयत्न करायचा, एकाची

साथ : १३५