" अमर काही आता परका राहिला नाहीये. आपल्या कुटुंबातलाच एक झालाय. तो हुशार आणि चांगला मुलगा आहे. त्याच्याशी जर मैत्री करायचा प्रयत्न केलास तर तुझं त्याचं चांगलं जमेल."
" मला माहीताय मी त्याच्यासारखा असायला पाहिजे होतो असं तुम्हाला पदोपदी वाटत असणार."
त्याच्या डोळ्यात आव्हान होतं, पण त्या आव्हानामागे तो तिची विनवणी करीत होता, तिच्याकडून आश्वासन मागत होता. तिच्या ओठावर आलं होतं, प्रताप, तुला त्याचा मत्सर का वाटतो ? तू माझा मुलगा आहेस. तो तुझी जागा कशी घेऊ शकेल ? पण शब्द काही तिच्या तोंडून बाहेर पडले नाहीत. ती फक्त म्हणाली, 'वेड्यासारखं बोलू नको."
तो एकदम उसळून म्हणाला, " वेडा मी नाहीये. वेडे तू आणि डॅडी आहात. तुम्ही त्याचं एवढं स्तोम माजवता कारण तो तुमची खुशामत करतो, दुसरं काही नाही. तुम्ही इतके आंधळे आहात की त्याचं देखणं थोबाड आणि सफाईदार वागण्यापलिकडे तुम्हाला काही दिसत नाही."
" त्याची बदनामी करण्याचं काही कारण नाही. त्याची कामातली हुशारी त्यानं सिद्ध केलीय. केवळ चार वर्षांत त्यानं कंपनीची विक्री दुप्पट केलीय. त्याचा काम करण्याचा उत्साह नवनव्या कल्पना हयांच्यामुळे सबंध सेल्स खात्यात त्यानं चैतन्य आणलं. त्याच्यासारखा माणूस मिळाला हे आमचं मोठं सुदैव. "
पुढे ते पुण्याला गेल्यावर अमर जरी येत – जात राहिला तरी प्रतापचा नि त्याचा फारसा संबंध येत नसे. त्यामुळेच की काय, प्रताप त्याच्याबद्दल बोलत नसे. पण त्याने तो विषय सोडून दिला नव्हता हे एकदम बऱ्याच दिवसांनी ज्योतीला कळलं.
त्यानं विचारलं, "अमरनं आपल्या कुटुंबाबद्दल जे सांगितलं त्याचा खरेपणा तुम्ही कधी पडताळून पाहिलाय ? त्यानं तुम्हाला वाट्टेल ते खोटेनाटं सांगितलंय."
प्रतापनं हेरगिरी करून अमरबद्दल कुठूनतरी माहिती काढण्याचे कष्ट घ्यावे याचं तिला आश्चर्य वाटलं आणि रागही आला.
साथ: १३३