पान:साथ (Sath).pdf/137

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्याचं एकमेव कारण म्हणजे तिनं आपलं आयुष्य रामच्या आयुष्यात बेमालूम मिसळून टाकलं होतं. तिनं जर दुसऱ्या कुठेतरी नोकरी केली असती तर आज रामला सोडल्यावर ती तरी नाहीशी झाली नसती.
 तिला अमरची आठवण झाली. आज खास आठवण व्हायचं कारण म्हणजे तो एकदा म्हणाला होता, "तुम्ही दोघं संपूर्ण आणि आदर्श जोडीदार आहात, कारण तुमच्यापैकी एकाचा विचार न करता दुसऱ्याचा करणं शक्यच नाही." हे ऐकून ती सुखावली होती. जणू हे तिचं कर्तत्व होतं आणि त्याबद्दल तो तिची प्रशंसा करीत होता. पण ह्यात तिचं असं कर्तृत्व नव्हतंच. जे जसं घडलं ते तसं तिनं घडू दिलं एवढंच. अमरचं मूळ विधान मात्र अचूक होतं. तिची आणि रामची भागीदारी परिपूर्ण होती कारण त्यात ती दोघं कार्यक्षम आणि आनंदीही होती, एकमेकांना पूरक होती.
 पण मग आता नक्की काय बदललं होतं ? वयामुळे, कामाच्या व्यापामुळे त्यांच्या नात्यात जे अटळ बदल झाले होते ते सोडले तर दुसरं काही बदललं होतं का? विनी एकदा म्हणाली होती, "लग्नाची गंमतच असते. आपण एका पुरुषाबरोबर वीस वर्ष राहतो, संसार करतो, दोन पोरं वाढवतो. हे करता करता दैनंदिन आयुष्यातल्या क्षुल्लक तपशिलातच इतक्या बुडून जातो की आपण एखादा काही संस्कार न झालेला अचेतन गोळा आहोत असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मग शेवटी आपली काहीतरी फसगत झालीय, काहीतरी महत्त्वाचं आपल्या हातून सुटून गेलंय अशी खात्री होते. हे आपण का करतो? कशासाठी आपण सगळ्यावर पाणी सोडतो? तो पुरुष त्याचं काम, त्याचे मित्र. त्याचा क्लब या सगळ्यांतून आठवण झाली की आपल्यासमोर फेकतो त्या भाकरीच्या तुकड्यासाठी ? कारण हयात प्रेमाबिमाचा काही भाग नसतो. प्रेम नावाच्या गोष्टीला पुरुषाच्या विश्वात काही स्थान नसतं."
 ज्या माणसाबरोबर वीस वर्ष संसार केला त्याच्याविषयी इतकी

[९]

साथ : १२९