पान:साथ (Sath).pdf/136

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

घेत नसे. त्यांचे कौतुकभरले कटाक्ष म्हणायचे, किती छान ! नवऱ्याला त्याच्या कामात अशी मदत करायला पाहिजे. म्हणजे ती एका बायकोचं कर्तव्य अतिशय उत्तम तऱ्हेनं बजावीत होती. एवढंच. ह्यापलिकडे तिच्या कामाची किंवा तिची स्वतःची किंमत नव्हती.
 ती शेतावरच्या गडी-बायांचे पगार करायची तेव्हा बायांना आपले पगार आपल्या नवऱ्यांच्या हातात दिलेले चालायचं नाही ह्याची ज्योतीला प्रथम गंमत वाटायची. मग असं का, ह्या बायांना असं करण्याची गरज का वाटते ते तिला कळत गेलं. आपल्या कष्टाचं फळ आपल्या हातात आलं पाहिजे हा आग्रह म्हणजे आपण स्वतंत्र आहोत हे ठासून सांगण्याचा एक मार्ग होता. नवऱ्याकडून शिव्या किंवा प्रसंगी मार खाणाऱ्या बाईने हा आग्रह धरण्याला एक विशिष्ट अर्थ होता. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे निम्मी लढाई जिंकणं. पण इथेही काही नवरे मारपीट करून किंवा धाकदपटशा दाखवून ह्या बायकांकडून पैसे काढून घ्यायचे. मग एखादवेळी पगारवाढ मिळाली की ह्या बायका ती मिळाल्याच नवऱ्यांना कळू देत नसत, आणि मिळालेला जादा पगार ज्योतीकड ठेवायला द्यायच्या अडीअडचणीला लागले तर असू देत पैसे म्हणून.
 ज्योतीला वाटलं, ही अक्कल माझ्यासारख्यांना का असू नये ! पहिल्यापासून तिनं पगार घ्यायला हवा होता पुढे ती घ्यायला लागली, पण तो हक्क म्हणून न घेता इन्कमटॅक्स खात्याला चकवण्यासाठी होता. आधीपासून खरं म्हणजे रामने ही कल्पना मांडली होती, पण तिनं ती धुडकावून लावली होती. स्वत:च्याच शेतावर आणि कंपनीत काम करण्यासाठी कसला पगार घ्यायचा? आता बायका घरकामाबद्दल, स्वतःचंच मूल संभाळण्यासाठीसुद्धा पगार मिळाला पाहिजे असं म्हणत होत्या. ते का ते तिला कळत होतं. ती जेव्हा आमची शेती, घर, कंपनी असं म्हणायची तेव्हा ती खरी रामची शेती, रामचं घर, रामची कंपनी होती हे तिला पुरं माहीत होतं तिनं रामला सोडल तर त्याबरोबरच हे सगळंही तिला सोडावं लागणार होतं. आणि

१२८ : साथ