पान:साथ (Sath).pdf/134

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पाठविणारा, अगदी गंभीरपणे त्या अमक्याला एकदा जेवायला बोलावलं पाहिजे, इंपोर्ट लायसेन्सचा काही वांधा झाला तर तो आपल्या उपयोगी पडेल, असं म्हणणारा हा राम तिला काही ओळखीचा वाटेना. तिला वाटायला लागलं की त्याचे संबंध माणसांशी नसून ती माणसं कोण आहेत याच्याशी असतात. त्यांच्या नव्या मित्रमंडळींपैकी प्रत्येकजण त्याच्या क्षेत्रातलं किंवा समाजातलं उच्च स्थान किंवा महत्त्वाच्या राजकारण्यांशी असलेली घसट किंवा एखादी खास कला किंवा गुण ह्यांसाठी मुद्दाम पारखून जोडलेला होता हे आपल्या फार आधीच कसं लक्षात आलं नाही ह्याचं, एकदा लक्षात आल्यावर ज्योतीला नवल वाटलं.
 एकदा ती वैतागून म्हणाली, " सारखं सारखं काय कुणाकडे तरी जेवायला जायचं किंवा कुणाला आपल्याकडे बोलवायचं ? अधनंमधनं आपण दोघंच शांतपणे घरी बसलो तर काय होईल?"
 " ज्यो, मला वाटलं तुला हे आवडतं."
 " आवडतं, पण-"
 " आवडतं ना? मग झालं तर. तू आनंदात असावंस एवढीच माझी इच्छा आहे."
 राम असल्या गोष्टी अगदी मनापासून म्हणे. पण ते आपलं नुसतं म्हणायचं म्हणून की तसं त्याला खरंच वाटायचं म्हणून हे तिला कळलं नव्हतं. तिला फार वाटायचं की त्याला सांगाव, " राम, हा खरा तू नाहीस. तू जसा होतास तसाच मला हवास. तुझ्यातल्या बऱ्याच गोष्टींबद्दल मी कुरकुर करायची खरी, पण तझा सगळा खरखरीतपणा घासून घासून हे अगदी गुळगुळीत व्हावास अशी काही माझी इच्छा नव्हती." पण हे शब्द तिच्या ओठांतून कधी उमटले नाहीत. शेवटी काय, कुणी माघारी फिर म्हटलं तर फिरू शकतं का ? राम तर नाहीच नाही. तो एकदा म्हणाला होता, "चाकोरीत अडकण्यापूर्वीच पुढला टप्पा गाठायला निघालं पाहिजे."

१२६ : साथ