पान:साथ (Sath).pdf/133

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

प्रकृतीबद्दल काळजी नव्हती. त्याबरोबरच तो आजारी मुलगा आपल्या दृष्टीआड व्हावा अशी निकड होती. आजाराशी जवळचा संबंध हा त्याला जीवघेणा अनुभव वाटे. त्याच्या वडिलांच्या शेवटच्या आजारात ज्योती नि आत्याबाईंनी मिळून त्यांचं सगळं केलं. राम फक्त दिवसातनं दोनतीनदा डोकवायचा न विचारायचा, " बाबा, आज कसं काय वाटतंय? काही हवंय का ? " आणि म्हातारा म्हणायचा. " आज बरं वाटतंय." आणि " काही नकोय. अक्का न ज्योती सगळं अगदी प्रेमानं करतात हो माझं."
 गाडीत बसता बसता ज्योती म्हणाली, " राम, हे सगळं तू करतोयस ह्याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये."
 " का बुवा ?" त्याच्या आवाजात खरंखुरं आश्चर्य होतं.
 " तुला आजारी लोकांना भेटायला जायचा नेहमी कंटाळा असे."
  " असं तुला का वाटायचं मला कळत नाही."
 " शिवाय तुला लग्नं, मर्तिक ह्यांना जायचाही कंटाळा असे नि ते तू शक्यतो टाळायचास."
 " मग मी बदललोय म्हण. किंवा परिस्थिती बदललीय. मी आजारी मित्रांच्या समाचाराला किंवा लग्नांना जायला तुझी काही हरकत आहे का? मला वाटलं मी ह्या गोष्टी उत्साहाने करीत नाही अशी तुझी तक्रार असायची."
  ज्योतीचं तोंड बंद झालं. तिनं अनेकदा त्याला असं बोलून दाखवलं होतं. तो आता आपली नवी भूमिका अगदी समरसून करीत होता आणि स्वतःकडे अलिप्तपणे पाहणं त्याला कधीच जमलं नव्हतं तेव्हा आपण आपल्या कल्पनेत जसे आहोत तसंच इतरांनी आपल्याला स्वीकारलं पाहिजे अशी त्याची साहजिकच अपेक्षा असे. पण यासाठी जी मानसिक कसरत करावी लागे ती ज्योतीला कधी कधी फार जड जाई. डझनभर निरनिराळ्या क्षेत्रांतल्या व्यक्तींशी कंटाळा न येता संभाषण करू शकणारा एका डायरीत असंख्य जणांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस वगैरेंची नोंद ठेवून त्या त्या तारखांना त्यांना शुभसंदेश किंवा छोट्यामोठया भेटी

साथ: १२५