पान:साथ (Sath).pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसं अर्धा तास बोलत बसला. मग आचरेकरांच्या बायकोला त्यानं, " वहिनी, काहीही जरूर पडली तर फोन करायला संकोच करू नका हं, अगदी रात्री अपरात्री सुद्धा " असं सांगितलं. हे सगळं ज्योती जवळजवळ अक्षरशः आ वासून पहात होती. मनात तुलना चालली होती कदमशी आणि त्याला जिथे ठेवलं होतं त्या वॉर्डाशी. कदम त्यांच्या कारखान्यात फोरमन होता. बी सुकवण्याच्या यंत्राच्या पट्टयात सापडून त्याच्या हाताचा चेंदामेंदा झाला होता. इन्शुरन्स कंपनीकडून पैसे येणारच होते. त्याव्यतिरिक्त रामने त्याच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी आणि नंतर हाताच्या ऑपरेशनसाठी सढळ हाताने पैसे दिले. पण तो काही कदमला भेटायला हॉस्पिटलमधे गेला नाही. ज्योती जाऊन भेटून आली. ती फळं, मिठाई घेऊन गेली, थोडा वेळ बसून बोलून तिने त्याला नि त्याच्या बायकोला धीर दिला, राम टूरवर गेलाय तो परत आला की येईलच भेटायला, असं खोटं सांगितलं.
 राम म्हणाला होता, " मला ह्या असल्या प्रसंगात काय बोलावं, काय करावं कळतच नाही ग. नुसतं तिथे जाऊन त्याच्या तोंडाकडे बघत बसायचं तर जाण्यात तरी काय अर्थ आहे ?"
 एकदा प्रताप खूप आजारी होता तेव्हा रामची घालमेल होत होती. तो सारखा म्हणे, "आपण त्याला पुण्याला घेऊन जाऊ. चांगल्या हॉस्पिटलमधे ठेवू."
 " हॉस्पिटल कशाला? एवढं काही झालं नाही त्याला."
 " अग, पण किती ताप आहे ! "
 " इथल्या डॉक्टरांनी तपासलाय त्याला. ते म्हणाले काळजी करायचं कारण नाही, मुलांचं टेंपरेचर एकदम चढतं."
 " त्यांना काय कळतंय ? "
  " का कळू नये ? उण्यापुऱ्या वीस वर्षाच्या प्रॅक्टिसचा अनुभव आहे. त्यात त्यांनी शेकडो मुलं तपासली असतील."
 " बघ तू. पण मला अजून वाटतं तू त्याला पुण्याला घेऊन जावंस."
 मग ज्योतीला एकदम समजलं की ही केवळ प्रतापच्या

१२४: साथ