पान:साथ (Sath).pdf/119

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दम काही बदल जाणवायचा. एकदम उंची वाढलेली वाटायची, केसांचं वळण बदललेलं असायचं, वागण्यात एखादी नवीनच लकब असायची, एखादा नवीन शब्द बोलण्यात वारंवार डोकवायचा. कधीकधी तिला वाटायचं की दरवेळी त्यांच्याशी नव्यानं ओळख करून घ्यायला लागते.
 " पुष्कळ दिवस झाले, " तो म्हणाला.
 " का ? तुला माहीताय ते चांगलं नाही म्हणून."
 " ममी, आता हे सुरू करू नकोस हं मी पुरेसा मोठा झालोय आता, एखादी गोष्ट केल्यामुळे फुफ्फुसाचा कॅन्सर होतो हे माहीत असूनसुद्धा जाणूनबुजन ती करण्याइतका. तेव्हा आता माझ्या प्रश्नाचं उत्तर दे बरं टाळाटाळ न करता."
 ज्योतीच्या अगदी ओठावर आलं होतं की तू पुरेसा मोठा असशील पण पुरेसा मिळवता नाहीस. तेव्हा हे महागडं व्यसन तू माझ्या जिवावर लावून घेतलंयस. पण तिला ते काही म्हणवलं नाही.
 " हं, सांग," प्रताप म्हणाला.
 " तू कशाबद्दल बोलतोयस? काय सांगायचं?"
 " ममी, हे जे सगळं घडतंय ते अगदी नॉर्मल आहे असं तुला म्हणायचंय का? एक म्हणजे, तू महाबळेश्वरला आतापर्यंत कधीही एकटी आलेली नाहीस."
 " आतापर्यंत न केलेली गोष्ट पुढे कधीही करू नये असा नियम आहे का?"
 " दुसरं. मी डॅडींना फोन करून विचारलं, की तू कुठे आहेस तर त्याच्याशी तुला काय करायचंय असं चमत्कारिक उत्तर मला मिळालं. तिसरं. तुला शोधीत इथपर्यंत पोचलो तेव्हा मला काय आढळलं? की तू एकटीच इथे हया बेकार होटेलात रहातेयस. सुट्टीवर असल्यासारखी. पण आत्ता सबंध वर्षातली तुमच्या लेखी सर्वांत महत्त्वाची वेळ आहे. आर्थिक वर्षाचा शेवट. आता हया सगळ्या गोष्टी मिळून काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय असं मला वाटलं तर ती काही आश्चर्याची गोष्ट नव्हे. काहीतरी

साथ : १११