पान:साथ (Sath).pdf/117

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कळतच नसे. त्यानं त्या दोघांना पोहायला शिकवायचा प्रयत्न केला. स्मिता सहज पाण्यात उतरली आणि भोपळा पाठीला बांधून हातपाय पाण्यावर आपटायला लागली. प्रतापला पाण्याची भयंकर भीती वाटली. थोडे दिवस थांबून त्याला हळूहळू पाण्यात खेळायला लावून त्याची भीती घालवायच्या ऐवजी रामने त्याला एकदम विहिरीत टाकलं. प्रताप नाकातोंडात पाणी जाऊन आणखीच घाबरला. त्याला बाहेर काढून पुन्हा रामने तेच केलं
 शेवटी ज्योती म्हणाली, " राम, तो बिचारा किती घाबरलाय दिसत नाही का तुला? किती छळणारेस त्याला ? अशाने त्याला कायमच भीती बसेल."
 " कधीतरी भीती सोडून तो हातपाय मारायला लागेल. सगळे असंच शिकतात.”
 पण प्रतापची भीती कधीच गेली नाही, आणि शेवटी कंटाळून रामने त्याचा नाद सोडून दिला.
 प्राथमिक शाळा झाल्यावर प्रतापला शिक्षणासाठी पाचगणीला इंग्लिश मीडियमच्या शाळेत घालायचं ही रामचीच कल्पना होती. ज्योतीला ते तितकंस पसंत नव्हतं.
 " त्याला उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळावं असं तुला नाही वाटत?"
 " अर्थातच वाटतं."
 " मग शिरगावचं हायस्कूल ही सगळ्यात उत्तम शाळा आहे असं तुला म्हणायचंय का?"
 " तसं नाही, पण इतक्या लहान वयात त्याला लांब पाठवायचं म्हणजे जरा जिवावर येतं. थोडी वर्ष थांबलं तर चालणार नाही का?"
 " एवढा काही तो लहान नाहीये. नऊ वर्षांची पुष्कळ मुलं आईबापांपासून लांब बोर्डिंग शाळांत जातात. खरं म्हणजे त्याला एकटं ठेवलं तर बरंच. जरा धीट बनेल. आणि कॉन्व्हेन्ट शाळेत जाणं महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे. अस्खलित इंग्रजी बोलायला यायला पाहिजे. म्हणजे माझ्यासारखं व्हायला नको."

साथ : १०९