पान:साथ (Sath).pdf/115

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाहीत तर ते मिळवायसाठी तो कोणते मार्ग काढील याची भीती वाटत होती. पैशांसाठी का होईना, आज तो माझ्याकडे येतो. तेवढाही बंध तुटला म्हणजे कुठे भरकटेल कोण जाणे. तेव्हा ती एखाद्या ब्लॅकमेलरला द्यावेत तसे त्याला पैसे देत राहिली.
 जेवता जेवता प्रतापने विचारलं, "तू ह्या होटेलात कशी काय?"
 " ह्यात काय वाईट आहे ? चांगलं चार होटेलांसारखं होटेल आहे."
  " मी हे वाईट आहे असं म्हटलंच नव्हतं. फक्त तू इथे राहिलीयस ह्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. म्हणजे हे काही ब्ल्यू व्हॅलीच्या पातळीवर नाही."
 " दर वेळी ब्ल्यू व्हॅलीला जायचा कंटाळा आलाय मला."
 " ममी ! तुला सोनेरी पिंजऱ्यात चक्क कोंडल्यासारखं वाटायला लागलंय ?"
 " तू मला शांतपणे जेवू देणारायस की नाही ?"
 " ठीक आहे, मन लावून जेव. नंतर बोलू आपण."
 " बोलायसारखं काही नाहीच आहे. की तुला काही सांगायचंय खरोखरच ?"
  " म्हणजे ते मुलीबद्दल म्हणतेस? नाही ग. माझ्या आयुष्यात काही सनसनाटी घडतच नाही."
 तो अगदी हात मारून जेवत होता आणि तो लहानपणी जेवणाबद्दल किती कटकट करायचा ते आठवत होतं तिला. तो एकेक घास तोंडात घोळवीत इतका चेंगटपणा करायचा की रोज रामकडून रागवून घ्यायचा. आणि राम ओरडला किंवा त्याने माराच्या धमक्या दिल्या की प्रताप आणखीच सावकाश जेवायचा. रामने खरोखरच हात उगारला की तो ओकारी काढायचा. शेवटी हा रोजचा तमाशा असह्य होऊन ज्योतीनं त्यांच्या जेवणाच्या आधी प्रतापला स्वैपाकघरात नेऊन जेवण भरवायला सुरुवात केली. एकदा रामने ते पाहिलं नि म्हणाला, " भरवतेयस काय त्याला? चांगला तीन वर्षांचा घोडा झालाय." तिनं

साथ: १०७