पान:साथ (Sath).pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ती वर्ष फार चांगली गेली असं तिला वाटत होतं. मग आताच असा काय बदल झाला होता की ज्यामुळे तन - मन कसाला लावून काम करण्यातला तो आनंद, नवनवी आव्हानं स्वीकारण्याची उत्सुकता सगळं लयाला गेलं होतं ? आपल्या आयुष्यातल्या एका मोठ्या कालखंडाची जी किंमत दिली त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळालं असा विचार आताच का तिच्या मनात यायला लागला?
 तिनं आदित्यकडे पाहिलं. तो तिच्याकडेच रोखून बघत होता.
  " कसलातरी गहन विचार चालला होता तुमचा."
 " माझा नवरा म्हणतो माझी मध्यमवर्गीय वृत्ती आहे -अल्पसंतुष्ट. त्याचं बरोबर आहे. आमचा धंदा लहानसा होता तेव्हाच मी सगळ्यात सुखी होते. त्यात चालणाऱ्या सगळया कामांत माझा प्रत्यक्ष भाग असे. बी प्लॅंटवर आल्यापासून तो त्याची विक्री होईपर्यंत. आता मी एका लहानशा एयर कंडिशन्ड कॅबिनमध्ये माझ्या हिशेब वह्या घेऊन बसते. मी महत्त्वाचं काम करते हे निर्विवाद आहे. हिशेब बघणं, ऑडिट, टॅक्सच्या सगळ्या बाबी सगळं माझ्याकडे आहे. मला इतकं काम असतं की बहुतेक दिवशी दुपारचं जेवण नीटपणे घ्यायलासुद्धा वेळ मिळत नाही. तरीपण आमच्या धंद्याचा मुख्य जो भाग आहे - म्हणजे बी आणि त्याच्यावरची प्रक्रिया वगैरे - त्याच्याशी माझा संबंध तुटलाय. मी एका पोकळीत काम करते असं मला वाटायला लागलंय."
 ती एकदम गप्प बसली. आपण हया सर्वस्वी अनोळखी माणसासमोर आपलं मन उघडं करून दाखवतोय हया विचाराने तिला अगदी कानकोंडं झालं.
 तो म्हणाला, " तुम्हाला वाटतंय ते अगदी साहजिक आहे. आधुनिक मोठमोठ्या उद्योगांत काम करणाऱ्या सगळ्यांनाच अस वाटतं ते एका प्रचंड यंत्रणेतला छोटासा भाग असतात. दिवस न दिवस तेच तेच कंटाळवाणं काम करतात. अर्थातच त्यातन त्यांना काही समाधान मिळू शकत नाही."
 " तुम्ही म्हणताय ते अगदी वेगळंच."

९८ साथ