पान:साथ (Sath).pdf/101

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अडकली आणि ती पडली. चटकन उठून तिनं हा काय मूर्खपणा चालवलायस असं स्वत:ला बजावलं. मग तिनं मुद्दाम शक्य तितकं संथपणे चालायला सुरुवात केली तशी तिला आपल्यामागे कसली तरी चाहूल लागली. कोण असणार ? लाकूडतोडे इतक्या उशिरानं काही घरी जात नाहीत, पर्यटक तर नाहीच नाही. मग कोण ? ती अजून मुख्य रस्त्यापासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर होती. तिच्या अंगावर तिचे नेहमीचेच दागिने होते. चार-चार पातळ सोन्याच्या बांगड्या, गळयात सोन्याची साखळी, रामने तिला पन्नासाव्या वाढदिवशी बक्षीस दिलेलं सोन्याचा पट्टा असलेलं घड्याळ. किंकाळी फोडली तर कुणाला ऐकू जाईल ? तिच्या हृदयाची धडधड तिच्या कानांत घुमत असताना एका बाजूने आपल्यावर एखादा दरोडेखोर किंवा बलात्कारी हल्ला करील ह्या कल्पनेची तिला मजा वाटत होती. असल्या गोष्टी आपल्याला होतील ह्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. आणि तरीही मनातली भीती जात नव्हती.
 तिच्यामागे एक आवाज आला, " नमस्कार."
 तिच्या मनात आलं, माझे दागिने चोरू पाहणारा किंवा माझ्यावर बलात्कार करणार असलेला माणूस काही मला नमस्कार म्हणणार नाही. तिनं वळून पाहिलं. मागनं येणारा माणूस ओळखीचासा वाटत होता. जरा जाडजूड होता मध्यम उंचीचा आणि गडद रंगाची पँट आणि पांढरा सदरा घातलेला. हातात काठी, डोळ्याला चष्मा."
  " एकदम बोललो म्हणून दचकला नाहीत ना?"
 "खरं म्हणजे चांगलीच दचकले, " ती एकदम हसून म्हणाली.
  " मग तुमची क्षमा मागायला पाहिजे. मी तुमच्याबरोबर परत गेलो तर हरकत नाही ना ? तुमच्याच होटेलात आहे मी. तुमच्या शेजारच्या खोलीत."
 "हं, म्हणजे तिथेच मी तुम्हाला पाहिलं असलं पाहिजे "
 पायवाट दोघांनी एकमेकांशेजारी चालण्याइतकी रुंद नव्हती, म्हणून ज्योती त्या माणसाच्या पुढे चालली होती. ती विचार

साथ : ९३