ज्योतीला वाटायचं की वरिष्ठ अधिकाऱ्याला हाताखालच्या माणसांशी किमान संपर्क तरी ठेवायला हवा. त्यांच्या - आपल्यात एक न ओलांडण्यासारखी दरी निर्माण करून कसं चालेल ? शिवाय बियाणाची कंपनी चालवणं हे काही वादळात बोट चालवण्यासारखं नसतं. तिथं सदैव आंधळं आज्ञापालन करण्याची काय गरज आहे ?
खरं म्हणजे हाताखालच्या लोकांशी वागण्याचे हे आडाखे रामच्या स्वभावानुसार होते. त्याला निरनिराळ्या माणसांत सहजपणे वावरण्याचं कौशल्य नव्हतं, आणि एकूणच माणसांचा कंटाळा, अगदी माणूसघाणेपणा म्हणावा इतका, होता. आता तो माणूसघाणा राहिला नव्हता, पण त्याच्यातला बदल वरवरचा होता. गप्पा मारणं. हास्यविनोद करणं इथपर्यंतच त्याची धाव होती. इतरांच्या अंतरंगात डोकावून बघायला तो अजूनही बिचकत असे आणि स्वत:चं मन तर त्यांच्यापैकी कुणाजवळच उघडं करीत नसे. कुणी आपल्या समस्या घेऊन त्याच्याकडे आलं तर तो त्यांचं ऐकून घ्यायचा, त्यांना सल्ला द्यायचा, पण तो स्वतःचे प्रश्न, अडचणी त्यांच्यासमोर कधी मांडीत नसे. एका तऱ्हेनं ज्योतीला त्याचा पूर्वीचा तुसडेपणा ह्या असल्या वागण्यापेक्षा जास्त प्रामाणिक वाटायचा.
झपाझप चालण्याच्या व्यायामाने आणि थंड हवेने ज्योतीला लवकरच पुन्हा प्रसन्न आणि ताजंतवानं वाटायला लागलं. अशा थंड, ताजी, निर्मळ हवा पुण्यात कधी अनुभवायला मिळत नसे. झाडांच्या गर्दीतून बाहेर पडते तो तिला कळून चुकलं की बराच उशीर झालाय आणि परत पोचेपर्यंत चांगलाच अंधार पडणार. पुन्हा जंगलात शिरलं तर जास्तच काळोख भासणार. पण मोकळा रस्ता फार लांब वळणं वाकणं घेऊन जात होता. शेवटी हिय्या करून ती आल्या वाटेने परत फिरली. अपेक्षेप्रमाण लवकरच अंधारलं आणि तिला जराशी भीती वाटायला लागली. ती झपाझप पावलं उचलायला लागली आणि शेवटी जवळजवळ पळायला लागली. एका पडलेल्या वाळक्या फांदीला तिची साडी
पान:साथ (Sath).pdf/100
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९२ : साथ