पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्रद्धास्थान आहे. या 'विघ्नहर्त्या' चे दर्शन घेऊनच अनेक सांगलीकर मंडळी कामाला लागतात आणि आपल्या चिंतांचं ओझं या 'चिंतामणी' च्या पायाशी ठेवूनच झोपी जातात ! ३. बागेतील गणपती : 'बागेतील गणपती' हे रम्य ठिकाण सांगलीकर जनतेसाठी, धार्मिक माहात्म्याबरोबरच, एक पिकनिक स्पॉट म्हणून अलीकडे लोकप्रिय झाले आहे. मिरज जहागिरीच्या गोविंद हरी पटवर्धन या पराक्रमी सरदारानी या देवालयाची स्थापना केली. श्रीगणपतीमंदिरापेक्षाहि हे मंदिर पुरातन आहे. त्यातील मूर्तीची प्रतिष्ठापना थाटामाटात १७६६-६७ च्या सुमारास झाली. हे देवालय सांगली-हरीपूर रस्त्यावर, कृष्णा नदीच्या काठी आहे. पूर्वीच्या काळी या भागाला बोरवन व गायरान म्हणून ओळखले जात असे. या ठिकाणी असलेल्या सुपीक कुरणात चिंचेची झाडे मुद्दाम एका रांगेत लावलेली होती. एका आख्यायिकेप्रमाणे, एका बैराग्याने ती चिंचेची बाग तयार केली आणि तिथंच त्याची समाधि आहे असं म्हणतात. मूळ मिरजेत वास्तव्य असणाऱ्या सरदार गोविंदहरीनी, त्या काळात सांगली आणि हरीपूरपासून जरा बाजूला असलेल्या या ठिकाणी आपल्या आराध्यदेवतेचे मंदिर कां बांधले असावे, याला काही ऐतिहासिक आधार नाही. बैराग्यासारख्या एखाद्या सत्पुरूषाच्या सांगण्यावरून असू शकेल. देवालय झाल्यानंतर, मूळ चिंचेच्या झाडांच्यापुढे मोठी बाग करण्यात आली होती. तिला 'हरीपूरबाग' असे म्हणत असत. आता बाग निघून गेली तरी या देवालयाला 'बागेतील गणपती मंदिर' असंच म्हणण्याचा प्रघात आहे. आज घडीलासुद्धा हा परिसर वृक्षराजींमुळे रम्य दिसतो. सांगलीचे माजी नगराध्यक्ष कै. अण्णासाहेब कराळे यानी या परिसरात फुलझाडे लावून 'भक्तिबाग' स्थापन केली. इथे जेवणखाण्याच्या सोयी झाल्यामुळे अनेक हौशी मंडळी घरगुती समारंभांच्या निमित्ताने, खास वनभोजन येथे आयोजित करतात. धार्मिक अत्सवांच्या वेळी या ठिकाणी मोठी वर्दळ असते. हौशी आणि रसिक लोक सकाळी फिरण्याच्या निमित्ताने या ठिकाणापर्यंत येतात आणि श्रीगजाननाचे दर्शन घेऊन नित्यकामाला लागतात. ४. हरीपूर : पटवर्धन घराण्यातील सरदार गोविंद हरी यानी इ.स. १७६८ मध्ये, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ, त्यांच्या नावाने हा गाव वसवला. त्यासाठी सहाशे बिघे जमीन स्वतंत्र काढून, हे हरीपूर, शंभर ब्राम्हणाना अग्रहार दिले. सांगली गावाला अगदी खेटून असलेलं हे गाव, कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. नद्यांचा संगम फार सुरेख आहे. तेथील विशाल पात्र, निळ्या-हिरव्या पाण्यावरून डौलाने वाहतूक करणाऱ्या होड्या, नीख शांततेचा मधुर भंग करणारे हिरव्यागार पोपटांचे थवे, नदीकाठची सदाहरित झाडी, यामुळे पुण्या- सांगली आणि सांगलीकर.. .२६०