पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 व्हायचे काय, कृष्णा नदीला येणाऱ्या पुरामुळे नदीवर पाणी भरताना सर्वांचेच, विशेषतः बायकांचे खूप हाल होत. कळशीभर पाण्यासाठी गुडघा गुडघा चिखल गाळापर्यंत जावे लागे. पाय घसरून पडायला व्हायचे. गावकरी गाळावर लाकडे, पालापाचोळा पसरून तात्पुरती वाट करत, पण मोठा पाऊस पडून पूर आला की, या वाटेवर आणखी नवा गाळ साचायचा. म्हणजे पुन्हा येरे माझ्या मागल्या! वर्षानुवर्षे हा प्रकार चालला होता. वसंतदादांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून नदीकाठी, नदीच्या पात्रापासून वरपर्यंत सुबक पायऱ्यांचा एक घाट बांधण्याचाच घाट घातला. सगळ्या गावकऱ्यांना एकत्र केले. श्रमदानाने काम करायची कल्पना सर्वांपुढे मांडली. त्यांना सांगितले की, आपण प्रत्येकजण पाटी-खोरी हातात घेऊ. गावात गवंडी आहेत. सुतार आहेत. आपली गाडी-बैल या कामासाठी वापरायची. घाटाच्या कामासाठी जो कोणी ज्वारीचे एक पोते मदत म्हणून देईल त्याच्या नावांची एक पायरी बसेल. या कल्पनेने सर्वांच्या मनात चैतन्याचे एक वेगळेच वारे संचारले. सगळ्यांच्या या कामाला हात लागले. बघता बघता एक सुबक घाट बांधून झाला!
 सहकाराची, संघशक्तीचे काय विलक्षण महात्म्य असते याची जाणीव लहान वयातच दादांना झाली. गोड बोलण्याने, सर्वांशी मिळून मिसळून वागण्याचे फायदे समजले.
 भावी जीवनासाठी ही मोठीच शिदोरी होती.
काँग्रेसमध्ये प्रवेश :

 शेतीमध्येच स्वतःला गुंतवून घ्यायचे ठरवून बसलेले वसंतदादा राजकारणाकडे कसे वळले असतील याचं थोडंसं नवल वाटण्यासारखेच

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / ९