पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षण सुरू झाले. कुठलेही काम मनापासून करायचे, जीव तोडून करायचे हा शाळेपासूनच वसंतदादांचा स्वभावधर्म बनला होता. त्यानुसार त्यांनी शेतीची कामेही जीव तोडून करायला सुरुवात केली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या कामाचे ते सातत्याने निरीक्षण करत. त्यामुळे शेतीच्या कामातील अनेक खाचाखोचींची त्यांना माहिती झाली. स्वतः घेतलेला अनुभव हाच त्यांचा गुरु बनला. दहा-दहा बैलांच्या नांगरावर नांगरट करणे, कुळवणी करणे, पेरणी करणे, धान्याची मळणी करणे, हातपंपाने पिकांना पाणी देणे आदी शेतीच्या कामांमध्ये ते तरबेज झाले. गवत कापणे हा तर त्यांचा आवडता उद्योग झाला होता.
 गवत घेऊन सांगलीच्या आठवडी बाजारात विक्री करायची तेव्हा गाडीभर गवताचे अवघे पाच रुपये मिळत. पण आपण कष्टाने मिळविलेल्या पैशाचा आनंद काय असतो याची त्यांना जाणीव झाली. या साऱ्या शिक्षणाचा दादांना भावी आयुष्यात फार मोठा फायदा झाला. मग साख कारखान्यांसाठी करावी लागणारी ऊसशेती असो वा शेंगेवरचे प्रक्रियात्मक उद्योग असोत. अनेक तथाकथित पढिक लोकांच्या ज्ञानापेक्षा, दादांच्या प्रत्यक्षातील अनुभवांची शिदोरी नेहमीच उजवी ठरत असे!

 शेती कसण्याच्या काळात गावातील तरुणांशी दादांचे खूप मैत्र जमले. त्यांच्याबरोबर तालीमबाजी करणे, नदीत पोहायला पडणे, सायकलवरून दूरदूरची रपेट करणे असे अनेक उद्योग चालत. त्यातूनच वसंतदादांनी एका ग्रामसुधारणा मंडळाची स्थापना केली. सार्वजनिक कामे करण्याची प्रेरणाही त्यातूनच त्यांना मिळाली. त्या मानसिकतेमुळेच त्यांना नदीकाठी घाट बांधायची कल्पना सुचली.

८ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील