पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाडलेले होते, पण आता लढाई हरल्यावर तिथे जाणे व्यापाऱ्यांना साहजिकच नामुष्कीचे वाटत होते. इथे वसंतदादांच्या मनाच्या मोठेपणाची, सर्वसमावेशक वृत्तीची आणि अस्सल नेतृत्वगुणाची ओळख सर्वांना झाली. शेतकऱ्यांच्या वतीने कायदेशीर लढाई जरी ते जिंकलेले असले तरी त्यांनी टेंभा मिरवला नाही की प्रतिष्ठेचा प्रश्न केला नाही. एके दिवशी सकाळी आपणहून उठून ते स्वतः व्यापाऱ्यांकडे गेले. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलले. झाले गेले विसरून जाण्याची कळकळीची विनंती त्यांना केली. त्यांचे गैरसमज दूर केले. त्यांची समजूत काढून नवीन मार्केट यार्डात येण्यासाठी सर्व व्यापाऱ्यांना त्यांनी राजी केले.
 हा होता खरा 'वसंतदादा टच. ' चित्रपट क्षेत्रात व्ही. शांताराम यांचा दिग्दर्शनातील नावाजलेल्या 'शांताराम टच' होता तसा. वसंतदादांच्या एकूणच कामात जो 'मानवी चेहरा' दिसायचा त्यामुळे अर्धीअधिक लढाई ते जिंकून जायचे. अर्थात् त्यामागे सर्वांचेच कल्याण व्हावे ही कळकळ असायची हे महत्त्वाचे.

 त्यानंतर एकूणच मार्केट कमिटीचा व्यवहार वसंतदादांनी इतक्या कुशलतेने चालवला की, त्याचा बोलबाला नुसत्या तत्कालिन मुंबई इलाख्यातच नाही तर संपूर्ण देशभर झाला. संयुक्त राष्ट्र संघटना या जागतिक संघटनेचे अन्न व शेती सल्लागार बॅ. जे. सी. ॲबेट यांनी सांगली मार्केट यार्डास ८ फेब्रुवारी १९६८ रोजी भेट दिली. तेथील एकूण कामाची पाहणी केली आणि वसंतदादांच्या नेतृत्वाचा कौतुकाने

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / २५