पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुखासमाधानात कशी राहतील याची उपाययोजना करण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे, अशी जाणीव ज्या द्रष्ट्या महाभागांना असते त्यापैकी वसंतदादा हे एक होते. ते स्वतः एक शेतकरी होते. केवळ स्वातंत्र्यलढा लढण्यासाठीच त्यांनी शेती सोडली होती. शेतकऱ्यांच्या काबाडकष्टांची त्यांना जाणीव होती. वर्षभर काळ्या रानात घाम गाळून शेवटी त्यांच्या हातात काय 'पडतं' याची वसंतदादांना जाणीव होती. याच्यामागची कारणे त्यांना माहीत होती. 'अनियंत्रित बाजारपेठ' ही या सर्व गोष्टींना कारणीभूत असणारी मुख्य समस्या होती. ज्या देशात ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोक शेती व्यवसाय करतात, त्यांच्या शेतीमालास योग्य बाजारभाव मिळेल, व्यापाऱ्यांकडून त्यांची फसवणूक होणार नाही असा विश्वास शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक होते.
 मार्केटयार्ड :
 या परिस्थितीवर एकच उपाय होता, तो म्हणजे नियंत्रित बाजारपेठेचा. पण ही गोष्ट अंमलात आणणे अवघड होते. शेतीमालाच्या खरेदीवर कोणत्याही तऱ्हेचे बंधन आणणे व्यापाऱ्यांना आवडणारे नव्हते.कारण त्यामुळे त्यांच्या नफा मिळविण्याच्या हेतूवरच घाला घातला जाणार होता. पूर्वी संस्थांनी राजवट असताना शेतकऱ्यांना संरक्षण देण्याच्या हे मांगलीच्या राजेसाहेबांनी असा प्रयत्न केला होता; पण व्यापाऱ्यांच्या रोधामुळे, असहकारामुळे राजेसाहेबांना माघार घ्यावी लागली हाती.

 पण आता गोष्ट वेगळी होती. आता लोकशाही आली होती.

२२ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील