पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला. यानंतरच्या काळात वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक विलोभनीय पैलूंचे दर्शन जनतेला व्हायचे होते.
 स्वातंत्र्यपूर्व काळातील आपली विचारसरणी, वर्तणूक आणि आता बदललेल्या परिस्थितीतील आपली वर्तणूक यामध्ये वसंतदादांनी जाणीवपूर्वक परिवर्तन घडवून आणले. स्वातंत्र्य मिळविण्यापूर्वीचा बंदुकीचा वापर, कारणपरत्वे दाखवलेली दहशत ही एक अपरिहार्य बाब होती. पण आता आपली सारी ताकद, शक्ती विधायक कामांसाठी वापरणे ही काळाची गरज होती. वसंतदादांचे मोठेपण हेच होते की, त्यांनी परिवर्तनाची आवश्यकता त्यावेळीच ओळखली! तत्कालिन सातारा जिल्ह्यातील गुंडगिरी, दहशत कमी करण्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले. क्रांतिकारक मार्गाने जाणाऱ्यांनी नवी वाट चोखाळावी, आपल्याकडे असलेली शस्त्रे सरकारकडे आपणहून जमा करावीत म्हणून दादांनी अनेकांना समजावले. मात्र त्यांचे प्रयत्न पूर्णपणाने यशस्वी झाले नाहीत.
 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वसंतदादानी समाजकारण आणि त्यांची प्रिय काँग्रेस संघटना यांनाच वाढून घ्यायचं ठरवलं. स्वराज्य कष्टाने मिळालंय तर त्याचं आता सुराज्य झालं पाहिजे, ही त्यांची तळमळ होती.

 तथापि सामाजिक परिस्थिती मात्र त्यावेळी काही काळ थोडी विचित्र बनली होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहा महिन्यातच महात्माजींचा खून झाला. त्यामुळे सर्वत्र जातीय दंगली माजल्या. देशाच्या फाळणीमुळे हिंदू- मुसलमान दंगली धुमसत होत्याच. त्यातच अन्नधान्याच्या टंचाईमुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती. या सर्व कारणांमुळे अंतर्गत

२० / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील