पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अडीच वर्षे शिक्षा भोगून २५ एप्रिल १९४६ रोजी परतणाऱ्या वसंतदादांचे सांगलीत अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. त्यांना घेऊन पुण्यातून येणाऱ्या रेल्वेच्या डब्यावर तिरंगी झेंड्यासह सजावट करण्यात आली. माधवनगर रेल्वेस्टेशनपासून सांगलीतील आमराई उद्यानापर्यंत वसंतदादांना मोटारीतून समारंभपूर्वक आणण्यात आले. हजारोंच्या संख्येने लोक त्यांची वाट पाहत उभे होते. तेथून एका सजवलेल्या रथातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. ज्या सांगलीत भूमिगत असताना वसंतदादा उघडपणे फिरू शकत नव्हते, त्याच सांगलीत लोक दुतर्फा उभे राहून त्यांचा जयजयकार करत होते आणि पोलिस पाहत होते. हा काळाचा महिमा होता.
 संध्याकाळी कृष्णाकाठी सत्काराची अभूतपूर्व सभा झाली. वनवासाहून परतणाऱ्या प्रभू रामचंद्रांना बघून अयोध्यावासी जनतेला जसा विलक्षण आनंद झाला तसा आनंद सांगलीकर जनतेला झाला होता.
 आणि मग चढाओढच लागली ती वसंतदादांचा सत्कार करण्याची. त्यांच्या पद्माळे गावात लेझीम, ढोल, बँडच्या साथीवर ५१ बैलगाड्यांच्या ताफ्यातून आपल्या गावच्या सुपुत्राची गावकऱ्यांनी मिरवणूक काढली. मग पाठोपाठ कसबे डिग्रज, कुपवाड, बिसूर, नांद्रे असे जागोजागी त्यांचे सत्कार झाले. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वसंतदादा आणि त्यांच्या सवंगड्यांनी प्राणांची बाजी लावून जे अपरिमित कष्ट उपसले त्याचीही पावती होती.
 थोड्याच दिवसात देश स्वतंत्र झाला.

 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर :

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / १९