पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



करताना शिपायांच्या गोळीबारात वसंतदादा कसे जबरदस्त जखमी झाले त्याची हकीगत सुरुवातीला आली आहेच.
 त्या प्राणांकित दुखापतीतून वसंतदादा वाचले ते केवळ सांगलीचे तत्कालिन सिव्हील सर्जन डॉ. आपटे यांनी केलेल्या यशस्वी ऑपरेशनमुळेच. पुढे त्यांच्यावर रीतसर खटला भरला गेला. तुरुंग फोडून पळून जाण्याच्या गुन्ह्यासह पूर्वीच्या गुन्ह्यांची छाननी झाली आणि एकूण १३ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा भोगण्यासाठी वसंतदादांची येरवडा जेलमध्ये १९४४ च्या सप्टेंबरमध्ये रवानगी करण्यात आली.

 १९४२ चा लढा आटोपून वसंतदादांना शिक्षा होईपर्यंत १९४४ साल उजाडलं होतं. ते येरवड्याच्या तुरुंगात शिक्षा भोगत होते तेव्हा हिंदुस्थानच्या आणि जागतिक राजकारणात बरीच स्थित्यंतरे घडत होती. दुसरे महायुद्ध संपले होते. हिंदुस्थानावर दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्लंडचे महायुद्धात चांगलेच कंबरडे मोडले होते. त्यामुळे ब्रिटिश मंडळी हिंदुस्थानातून निघून जाण्याच्या मनःस्थितीत होती. स्वातंत्र्य दृष्टोत्पत्तीस आले होते. राज्यकर्त्यांमध्ये त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडीशी ढिलाई आली होती. एखादे कार्यालय बंद होण्याच्या सुमारास असते तशी. त्याचा फायदा उठवावा अशा विचाराने सांगलीकर लोकांनी वसंतदादांच्या सुटकेसाठी एक मोहीमच उघडली. मोर्चे काढले. अनेक सभांचे आयोजन झाले. त्यात बॅ. नाथ पै, स्वामी रामानंद भारती आदींची जोरदार भाषणे झाली. तत्कालिन सांगली संस्थानचे राजेसाहेब, चिंतामणरावांकडे अनेक शिष्टमंडळे नेण्यात आली. या साऱ्यांचा इष्ट परिणाम झाला. राजेसाहेबांनी वसंतदादांच्या सुटकेचा हुकूम काढला.

१८ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील