पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पैशातून बंदुके, स्फोटके गोळा करायची आणि ब्रिटिश सत्ता खिळखिळी करायची.

 पण हे कसं शक्य होणार होतं?

 एका मोठ्या सत्तेसमोर पाच-पन्नास माणसे काय करू शकणार? वनराज सिंहाला उंदराने आव्हान देऊन ललकारावे अशी स्थिती होती. पण वसंतदादा आणि त्यांचे सहकारी, काही करून स्वातंत्र्य मिळवायचे या कल्पनेने भारलेले होते. त्या काळात त्यांनी भूमिगत राहून उपसलेल्या कष्टांची आज कुणालाही कल्पना येणार नाही. आपल्या कुटुंबियांपासून दूर रानावनात राहायचे, वेष पालटून, नावे बदलत हिंडायचे. जेवायला खायला कधी मिळेल, न मिळेल याची खात्री नसायची. पोलिसांचा पाठलाग चुकवताना अनेकदा रानातली कच्ची उंबरे, वांगी, मक्याची कणसे, रताळी-गाजरे तर कधी नुसताच झाडपाला खाऊन पोटाची खळगी भरायची असा वसंतदादांचा दिनक्रम असायचा. कधी कधी उपाशीपोटी राहायला लागायचे. बऱ्याचदा आश्रयासाठी पद्माळेच्या मळीत ही सगळी मंडळी एकत्र जमायची. ती मळी एका बाजूला असल्याने, कुणाला तसा सुगावा लागायचा नाही. गावात सांगावा गेला असला तर वसंतदादांचे बंधू, शामरावदादा आणि इतर गावकरी हारा भरून भाकऱ्या आणायचे, घागरीतून कालवण आणायचे. सगळ्या क्रांतिकारकांना असे कधीतरी भरपेट जेवण मिळायचे!

 पण या लढ्याचा शेवट काय होणार याची सर्वांनाच कल्पना होती आणि झालंही तसंच. भूमिगत राहून काम करताना वसंतदादा सांगलीत मुक्कामाला आले की वेगवेगळ्या ठिकाणी राहत. पोलिस मागावर

१६ / सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील