पान:सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भूमिकेत झालेले दिसते. गांधीजींवर नितांत श्रद्धा असणारे, शांत वृत्तीचे वसंतदादा जहाल क्रांतिकारकांच्या भूमिकेत दिसणे असे आश्चर्याचेच होते. आपण शांततामय मार्गाने आंदोलने करतो पण सरकार मात्र शस्त्रांच्या आधारे आपल्याला चिरडून टाकते. मग आपण पण शस्त्र हाती का ये धरू? एक प्रकारच्या वैतागापोटी वसंतदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी असा निर्णय घेतला असावा. आता शस्त्रे काही फुकट मिळत नाहीत. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. तिथे शस्त्रे विकत मिळू शकत. मात्र चोरून आणावी लागत. आपल्या पद्माळे गावातील आणि सांगली परिसरातील तरुणांची एक तुकडीच वसंतदादांनी तयार केली. त्यामध्ये हिंदुराव पाटील, धोंडीराम माळी, रंगराव पाटील, बापू जामदार, वामनकाका पाटील, नारायण अण्णा जगदाळे असे बरेच तरुण होते.

 तारुण्याचा जोश होता. ब्रिटिशांवरची चीड होती. त्यांची सत्ता खिळखिळी करणे, दहशत निर्माण करणे अशा उद्देशाने अनेक विध्वंसक योजना आखण्यात आल्या आणि फारसा पुढचा मागचा विचार न करता एकदम हल्लाबोल सुरू झाला. बुधगावला जाऊन संदेश यंत्रणा बंद पाडण्याच्या हेतूने टेलिफोनच्या तारा तोडण्यात आल्या. भिलवडी- तासगावच्या रस्त्यावर पोस्टाच्या रनरला गाठून लुटण्यात आले. नांद्रे- भागात मालगाडी पाडण्यात आली. प्रवासी गाड्यांना मात्र हात लावायचा नाही असे आधीच ठरवण्यात आले होते. बार्शी लाईट रेल्वेच्या मार्गावरील आरग, बेडक, बेळंकी आदी स्टेशने पेटवून देण्यात आली. पगाराच्या थैल्या घेऊन जाणाऱ्या अनेक गाड्या लुटण्यात आल्या. सगळ्या उचापतींचा अर्थ एकच. कुठल्या तरी मार्गाने पैसा उभा करायचा. त्या

सांगलीचे शिल्पकार वसंतदादा पाटील / १५